नवी दिल्ली/मुंबई – पाकिस्तान होऊ घातलेल्या बहुराष्ट्रीय सैनिकी अभ्यास शिबीरात भारतीय सैन्य सहभागी होणार की नाही, याबबात अनिश्चितता आहे. यादरम्यान सेनेच्या अधिकाऱ्यांनी सस्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. पाकिस्तानात शांघाय कोअपरेशन आर्गनायझेशन (एससीओ) च्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. भारतही या संघटनेचा सदस्य आहे.
गेल्या काही दिवसांपासून याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. सैन्य युद्धाभ्यास शिबिरात सहभागी होणार का, असा प्रश्न भारतीय सैन्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याला एका वृत्तवाहिनीने विचारला असता, ते म्हणाले की, ‘पाकिस्तानातील या शिबिराशी संबंधित कुठलाही प्रस्ताव आम्हाला प्राप्त झालेला नाही.’
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये नौशहरा जिल्ह्यातील पाब्बी येथे हे शिबीर होणार आहे. त्याचवेळी पाकिस्तानातील माध्यमांनी देखील अद्याप भारताला आमंत्रित करायचे की नाही याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही, असे वृत्त प्रकाशित केले आहे. यापूर्वीही पाकिस्तान, चीन आणि भारत हे तिन्ही देश बहुराष्ट्रीय युद्धाभ्यास शिबिरांमध्ये सहभागी झालेले आहेत.
अर्थात गेल्यावर्षी भारताने या शिबिरात सैनिक पाठवले नव्हते. लडाखमध्ये सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. एससीओमध्ये भारत आणि पाकिस्तान २०१७मध्ये स्थायी सदस्य म्हणून सामील झाले होते. यात चीन, रुस, कजाकिस्तान आणि किर्गीस्तान संस्थापक सदस्य आहेत.