सिडनी – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ आगामी कसोटी सामना न खेळताच परत येण्याची शक्यता आहे. क्वीन्सलँडचे आरोग्य मंत्री रोज बेट्स यांच्या टिप्पणीनंतर हा चौथा सामना खेळावा की नाही, याबद्दल बीसीसीआय विचार करत आहे. ४ सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १ – १ अशा बरोबरीत आहेत.
भारतीय खेळाडूंनी नियम पाळायला हवेत, जर ते तसं करत नसतील तर त्यांनी चौथी कसोटी खेळण्यासाठी ब्रिस्बेनला जाऊ नये, असे विधान बेट्स यांनी केले होते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारची विधाने भारतीय संघाची प्रतिमा डागाळणारी आहेत. त्यामुळे आता आम्ही ४ सामन्यांची ही मालिका ३ सामन्यानंतर आटोपती घेण्याचा विचार करत आहोत. ७ तारखेपासून सिडनी येथे तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. भारतीय खेळाडूंनी ब्रिस्बेन कसोटीसाठी पुन्हा एकदा क्वारंटाईन होण्यास नकार दिल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. गेले ६ महिने आम्ही सतत क्वारंटाईनसारख्या परिस्थितीचा सामना करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातच नियमांचे पालन करायचे नसल्यास खेळाडूंचे स्वागत नसल्याच्या बेट्स यांच्या विधानाने त्यात भर पडली आहे.
एखाद्या लोकप्रतिनिधीची जर अशी इच्छा असेल, तर हे फार वाईट आहे. यामुळे भारताची प्रतिमा खराब होत असल्याचे, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. आम्ही नेहमीच नियमांचे पालन करतो. रोहित शर्माचे क्वारंटाईनमध्ये राहणे हे याचेच उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही आम्ही ऑस्ट्रेलियासाठी कोणतीही अडचण उभी करू इच्छित नाही. आमच्या येथील चाहत्यांकडून आम्हाला खूप प्रेम मिळाले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले की, ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटीबद्दल भारताकडून अधिकृतरित्या काहीही कळलेले नाही. त्यामुळे सध्या ही मालिका नियोजित पद्धतीनेच होईल.