नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने २०२०-२१ या एकाच वर्षात ६,०१५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करत नवा विक्रम रचला आहे. कोविड महामारीचा काळ असूनही गेल्यावर्षी म्हणजेच २०१८-१९ मध्ये ५,२७६ किमीचे रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचा विक्रम रेल्वेने यावर्षी स्वतःच मोडला आहे.
कोविडच्या अत्यंत कठीण काळात, वर्ष २०२०-२१ मध्ये ६००० किमी पेक्षा अधिक लांबीच्या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करणे हा रेल्वेसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
यामुळे भारतीय रेल्वे अधिकाधिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जेच्या दृष्टीनेही सक्षम बनली आहे.भारतीय रेल्वेचे सध्याचे ब्रॉड गेज नेटवर्क ६३,९४९ किमी इतके असून त्यात कोकण रेल्वेचे ७४० किमी धरल्यास, हे एकूण ६४,६८९ किमी मार्ग इतके आहे.
यापैकी एकूण ४५,८८१ किमी मार्ग म्हणजेच ७१ % विद्युतीकरण ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण झाले आहे.
अलीकडच्या काळात, देशाचे आयातीत पेट्रोलियम इंधन म्हणजेच डीझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने, तसेच भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने, एक पर्यावरण पूरक, जलद आणि उर्जा सक्षम अशा सार्वजनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देण्याच्या विचाराने, अलीकडच्या काही वर्षात रेल्वेच्या विद्युतीकरणावर मोठा भर देण्यात आला आहे.
गेल्या सात वर्षात म्हणजेच २०१४ ते २१ या काळात, आधीच्या सात वर्षांच्या म्हणजेच २००७-१४ या काळाच्या तुलनेत, पाच पटपेक्षा अधिक विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
२०१४ पासून आजपर्यंत २४,०८० किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले असून एकूण कामांपैकी ३७% काम पूर्ण झाले आहे.
वर्ष २००७-१४ या काळात ४,३३७ केवळ किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले होते.
आतापर्यंत एकूण ४५,८८१ रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आये असून, त्यापैकी ३४ % काम गेल्या तीन वर्षात पूर्ण झाले आहे.
भारतीय रेल्वेने वर्ष २०२०-२१ मध्ये ५६ कर्षण उपकेंद्रे (Traction Sub Stations) लोकार्पित केले आहेत, याआधी केवळ एका वर्षात ४२ कर्षण उपकेंद्रे बांधून झाली होती, उपकेंद्र बांधणीच्या वेगातही कोविड काळात ३३% सुधारणा झाली आहे.
गेल्या सात वर्षात रेल्वेने एकूण २०१ कर्षण उपकेंद्रे बांधून पूर्ण केली आहेत.
भारतीय रेल्वेने विद्युतीकरण पूर्ण केलेल्या काही महत्वाच्या रेल्वेमार्गांची यादी खालीलप्रमाणे.
-
मुंबई-हावडा मार्गे जबलपूर
-
दिल्ली-दरभंगा-जयनगर
-
गोरखपूर-वाराणसी मार्गे अनुरिहार
-
जबलपूर-नैनपूर-गोंदिया-बल्लारशाह
-
चेन्नई-त्रिची
-
इंदौर-गुणा-ग्वालियर-अमृतसर
-
दिल्ली-जयपूर-उदयपूर
-
नवी दिल्ली-न्यू कूचबिहार-श्रीरामपूर आसाम- द्वारे पटना आणि कटिहार
-
अजमेर-हावडा
-
मुंबई-मारवाड
-
दिल्ली-मोरादाबाद-तानकपूर
भारतीय रेल्वेने आपल्या सर्व रेल्वेमार्गाचे डिसेंबर २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संपूर्ण विद्युतीकारणाचे उद्दिष्ट साध्य केल्यास, वर्ष २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात रेल्वेचा मोठा हातभार लागू शकेल.