मुंबई – भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील वेग कायम आहे. ऑक्टोबर२०२० मध्ये रेल्वेने याच कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक मालवाहतुक आणि अधिक कमाई केली आहे.ऑक्टोबर २०२० मध्ये, भारतीय रेल्वेची मालवाहतूक १०८.१६ दशलक्ष टन होती, जी गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १५ टक्के नी अधिक आहे (९३.७५ दशलक्ष टन). या कालावधीत रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून १० हजार ४०५ कोटी १२ लाख रुपये कमावले, जे गेल्यावर्षी ९ हजार ५३६ कोटी २२ लाख होते. या वर्षी तुलनेत ८६८ कोटी ९० लाख रुपये अधिक मिळाले आहेत.
ऑक्टोबर २०२० मध्ये भारतीय रेल्वेची मालवाहतूक १०८.१६ दशलक्ष टन होती, यात ४६.९७ दशलक्ष टन कोळसा,१४.६८ दशलक्ष लोह खनिज, ५.०३ दशलक्ष अन्नधान्य, ५.९३ दशलक्ष टन खते आणि ६.६२ दशलक्ष सिमेंट होते. उल्लेखनीय बाब म्हणजे रेल्वे मालवाहतूक अतिशय आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून बऱ्याच सूट/सवलती दिल्या जात आहेत.
रेल्वे मंत्रालयाने व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आणि विद्यमान ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोह आणि स्टील, सिमेंट, वीज, कोळसा, वाहन आणि पूरक सेवा पुरवणाऱ्या उद्योजकांसमवेत बैठक घेतली. पंजाबमधील मालवाहतूक खंडित असूनही व्यवसाय वृद्धीसाठी विभागीय पातळीवरील घटकांनी रेल्वे मालवाहतूकीचा वेग दुप्पट करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी चांगले योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे कोविड १९ चा वापर भारतीय रेल्वेने कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्यासाठी केला आहे.