मुंबई – चित्रपट सृष्टीतील जागतिकस्तरावरील मानांकित ऑस्कर पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय कलाकार ज्येष्ठ वेशभूषाकार भानू अथय्या यांचे निधन झाले आहे. आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून त्या ख्यात होत्या. जमिनीवर पाय असलेली पण तितक्याच उत्तूंग सर्जनशीलतेची महान कलाकार आपल्यातून निघून गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. यांना अर्पण केली आहे.
भारतीय कला क्षेत्राला विशेषतः चित्रपट सृष्टीला खुणावणारे ऑस्कर भानू अथय्या यांनी आपल्या वेशभूषाकाराच्या निपुणतेने खेचून आणले. मुळच्या कोल्हापूरच्या मराठी कुटुंबातून आलेल्या भानूजींनी चित्रपट सृष्टीत आपला असा दबदबा निर्माण केला. हिंदी चित्रपट सृष्टीतील शंभरहून अधिक चित्रपटात त्यांनी आपल्या वेशभूषाकाराच्या कामाची छाप उमटवली. आजही या चित्रपटातील त्यांची कामगिरी टवटवीत आणि नजरेत भरणारी अशी वाटते. गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा ऑस्कर पुरस्कार मिळूनही त्या अलिकडच्या चित्रपटांसाठी नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करत राहील्या. त्यांचा भारतीय संस्कृती आणि परंपरांचा कलाविष्कारांच्या अंगाने गाढा अभ्यास होता. उत्तूंग सर्जनशीलता असूनही जमिनीवर पाय असलेल्या त्या महान कलाकार होत्या. आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील. भानू अथय्या या सुषमा शिरोमणी निर्मित ‘फटाकडी ‘ या चित्रपटाव्दारे मराठी चित्रपटात आल्या. आणि विशेष कामगिरी केली.
मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. १९८३ मध्ये गांधी या प्रसिद्ध चित्रपटाच्या उत्कृष्ट वेशभूषेकरिता प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.