नवी दिल्ली – दोन्ही देशांमधील विशेषतः सैन्यांमधील परस्पर संबध राखण्याच्या मोहिमेला अनुसरून भारतीय सेनेने प्रशिक्षित 20 लष्करी अश्व आणि विस्फोटके शोधणारे 10 श्वान बांगलादेश लष्कराला भेट दिले. घोडेस्वार आणि श्वानप्रशिक्षक भारतीय लष्कराच्या रेमाऊंट आणि व्हेटर्नरी कॉर्पसमधून प्रशिक्षित झालेले आहेत. भारतीय लष्कराने बांगलादेश लष्करातील कर्मचाऱ्यांना या खास श्वानांच्या आणि अश्वांच्या देखभालीचे प्रशिक्षणही दिले आहे.
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रम्हास्त्र कॉर्पचे सेनाध्यक्ष मेजर जनरल नरेंद्र सिंह खरौद, तर बांगलादेश शिष्टमंडळाचे नेतृत्व जैसोरची लष्करी तुकडीचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद हुमायु कबीर यांनी केले. हा कार्यक्रम पेत्रापोल-बेनापोल या भारत बांगलादेशदरम्यानच्या एकत्रित चेकपोस्टवर झाला. ढाक्यातील भारतीय राजदूत ब्रिगेडीयर जे.एस चिमा या सोहोळ्याला उपस्थित होते.
पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशसोबत भारताची भागीदारी ही या प्रदेशातील चांगल्या शेजारधर्माचे उदाहरण म्हणून उठून दिसते. या कृतीमुळे दोन्ही देशांमधील बंध दृढ झाले आहेत.
“भारतीय लष्करातील लष्करी श्वानांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. मैत्रीपूर्ण संबध राखणाऱ्या बांगलादेशसारख्या देशाला आम्ही नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा श्वान त्यांचे शौर्य दाखवून दिले आहे. भेट दिलेले हे श्वान, स्फोटक आणि प्रतिबंधित पदार्थ शोधण्याच्या बाबतीत अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे”, असे ब्रम्हास्त्र कॉर्पचे सेनाध्यक्ष मेजर जनरल नरेंद्र सिंह खरौद यांनी यावेळी सांगितले.