नवी दिल्ली – भारताने रविवारी एक नवीन उच्चांक स्थापन केला. देशभरात एकाच दिवसात ७ लाखाहून अधिक चाचण्या केल्या. गेले अनेक दिवस एकाच दिवसात ६ लाखाहून अधिक चाचण्या सुरू ठेवल्यामुळे भारताच्या चाचण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७ लाख १९ हजार ३६४ चाचण्या घेण्यात आल्या.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अशा सर्वाधिक चाचण्यामुळे दररोज बाधित रुग्ण आढळण्याची संख्याही झपाट्याने वाढेल. मात्र राज्यांना व्यापक शोध मोहीम, त्वरित अलगीकरण आणि प्रभावी उपचारांवर भर देतानाच टेस्ट, ट्रॅक , ट्रीट या केंद्र-प्रणित रणनीतीचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात ज्या राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे अशा राज्यांबरोबर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत.
अशा भरीव कामगिरीचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे . काल एका दिवसात सर्वाधिक ५३ हजार ८७९ कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतले. याबरोबरच बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १४ लाख ८० हजार ८८४ वर पोहोचली आहे. उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे (आज ६ लाख २८ हजार ७४७) बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या २.३६ पटीने अधिक असून हा नवा उच्चांक आहे. सक्रिय रुग्ण घरी अलगीकरणात किंवा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहेत.बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढल्यामुळे बरे होण्याचा दर वाढत असून आज हा दर ६८.७८ % आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यामधील वाढते अंतर रूग्णालयात किंवा घरी अलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे दर्शवते, असे मंत्रालयाने सांगितले आहे.