नागपूर – लसनिर्मिती कंपनी भारत बायोटेकतर्फे आता नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरू झाली आहे. नागपूरसह देशातल्या चार ठिकाणी ही चाचणी गोपनीय पद्धतीनं घेण्यात येत आहे. भारत बायोटेकनं काही दिवसांपूर्वी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे या लसीच्या चाचणीची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यानंतर ही चाचणी नागपूरसह इतर तीन शहरांमध्ये घेण्यात येत आहे.
नागपूरमध्ये इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी ज्या रुग्णालयांमध्ये झाली, त्यातील डॉक्टर्सनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. भारत बायोटेकचे प्रवक्ते हैदराबादमध्ये बोलतील, असं ते म्हणाले. ही चाचणी १८ ते ५५ वयोगटातील लोकांमध्ये केली जात आहे. भारतात प्रथमच नाकावाटे लस देण्याची चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगाणा आणि बिहार या चार राज्यात या लसीची चाचणी सध्या सुरू आहे.
नाकाद्वारे लसीचा थेट परिणाम
नाकाद्वारे लस दिल्याने ती थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचते. त्यामुळे ती अधिक परिणामकारक ठरते असा समज आहे. लस देण्याआधी स्वयंसेवकांची आरोग्य चाचणी केली जाते. ही लस देताना स्वयंसेवक पूर्णपणे स्वस्थ असावे. ती देण्यापूर्वी त्यांची कोरोना आणि अँटीजन चाचणीशिवाय इतर चाचण्या केल्या जातात.