नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र लस तयार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात देखील लसीवर काम सुरु असून यात मोठे यश मिळाले आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने पुढच्या आठवड्याच्या सुरूवातीला भारत बायोटेकच्या अँटी-कोरोनाव्हायरस लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरवात करणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत बायोटेकला गेल्या आठवड्यात भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलकडून मान्यता मिळाली आहे. एम्स दिल्लीचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीसाठी काम सुरु झाले आहे, लवकरच चाचणी करून संबंधित अहवाल समितीपुढे सादर केला जाईल असे मत राय यांनी यावेळी व्यक्त केले. ट्रायल सुरू करण्यापूर्वी कोणत्याही साइटची परवानगी घेणे आवश्यक आहे. देशाच्या बायोमेडिकल रिसर्च नियामक – इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या नियमांनुसार, समितीला क्लिनिकल संशोधनाची देखरेख करावी लागेल आणि चाचणी सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी कोणत्याही साइटवरील प्रस्तावाचे संपूर्ण पुनरावलोकन करावे लागेल.
एम्सच्या नीतिशास्त्र समितीचे १५ सदस्य आहेत आणि आवश्यक मंजूरी देण्यासाठी अंदाजे १० ते १४ दिवस लागतील असे राय यांनी सांगितले. संबंधित अहवाल विस्तृत असून त्यावर अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देणें आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीसाठी ३० जून रोजी प्रस्ताव सादर केला होता, त्यावर १८ जुलै रोजी मंजुरी देण्यात आली. आता तिसऱ्या टप्यासाठी २ ऑक्टोबरला प्रस्ताव सादर केला होता, त्यावर २२ ऑक्टोबरला संमती मिळाली आहे. या अंतर्गत १३ ते १४ राज्यांमध्ये २६ हजार पेक्षा जास्त जणांना लस देण्याच्या प्रयत्नात असल्याचे राय यांनी सांगितले.