नवी दिल्ली ः भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं डोकं वर काढलं असून, संसर्गाचा आलेख चढाच राहात आहे. गेल्या दोन दिवसात १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. दररोज होणारे मृत्यूही शंभरच्या वर पोहोचले आहेत. कमी तपासण्या, नवा स्ट्रेन, लसीकरणाला होणारा उशीर यासह पाच कारणांमुळे परिस्थिती नियंत्रणात येईल असे वाटत असताना ती पुन्हा बिघडू लागली आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यावर सरकारनं त्वरित पावलं उचलणं आवश्यक आहे.
१) दररोजच्या निम्म्या तपासण्या
भारतीय आरोग्य संशोधन परिषदेच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशात प्रतिदिन दहा लाखांहून अधिक कोविडच्या तपासण्या केल्या जात होत्या. परंतु या वर्षी फेब्रुवारीत केवळ सहा ते आठ लाखांपर्यंत तपासण्या होत आहेत. गेल्या चोवीस तासात देशात ८,३१,८०७ नमुन्यांची तपासणी झाली आहे. देशात आतापर्यंत एकूण २१,४६,६१,४६५ नमुन्यांची तपासणी झाली आहे.
२) पॉझिटिव्हिटी रेट वाढला
देशात दररोज होणा-या कोरोना तपासण्यांची संख्या घटली असली तरी नमुने पॉझिटिव्ह होण्याचा दर ५ टक्क्यांहून अधिक आहे. याचाच अर्थ असा आहे, की आवश्यकतेपेक्षा कमी तपासण्या होत असूनही त्यातील पॉझिटिव्हीटी दर अधिक आहे. गेल्या दोन महिन्यात देशात तपासणी पॉझिटिव्हीटी दर जवळपास ६ टक्के होता. तो या महिन्यात ५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोणत्याही देशात पॉझिटिव्हीटी दर लगातार दोन आठवड्यांपर्यंत पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तरच संसर्गावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं.
३) कोरोनाच्या नव्या अवताराचा परिणाम
ब्रिटेनमध्ये सर्वात प्रथम आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराचे १८० हून अधिक रुग्ण भारतात आढळले आहेत. तसंच दक्षिण अफ्रिका आणि ब्राझीलमधून इतर देशात फैलाव झालेल्या कोरोनाच्या दुस-या अवताराचे रुग्णही भारतात अनेक ठिकाणी आढळले आहेत. देशात नुकताच नवा स्ट्रेन आढळला आहे. परंतु तो कोरोनाचा संसर्ग आहे का याबाबत सरकारकडून पुष्टी झाली नाही.
४) निष्काळजीपणी भोवतोय
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, डिसेंबर-जानेवारीत देशात कोरोना संसर्ग घटला होता. त्यानंतर लोक बेफिकीरीपणे वागू लागले. तसंच तपासण्याही कमी झाल्या. या कारणांमुळेच आता महाराष्ट्रासह पाच राज्यात संसर्ग वाढला आहे. देशातील लोकांच्या शरीरात कोरोनाची प्रतिजैविके तयार होणं हेसुद्धा संसर्ग कमी होण्याचं कारण असू शकतं, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. नुकतेच झालेले सिरो सर्वेक्षण या गोष्टीकडे इशारा करत आहेत की, देशात मोठी लोकसंख्या विषाणूच्या संसर्गात येऊन बरी झाली आहे. गेल्या महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे अतिउत्साहित झालं नाही पाहिजे. कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना संसर्ग झाला असला तरी त्यांच्यात लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे बेफिकीरी टाळली पाहिजे.
५) लोकसंख्येच्या तुलनेत मंद गतीनं लसीकरण
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या आवर वर्ल्ड इन डाटा संस्थेनुसार, भारतात सध्या प्रत्येक १०० व्यक्तिमागे एकालाच लस दिली जात आहे. ब्रिटेनमध्ये प्रति १०० व्यक्तिंमागे २७ आणि अमेरिकेत १९ लोकांना लस दिली जात आहे. जुलैपर्यंत ३० कोटी लोकांना लस देण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. ही स्थिती पाहिल्यास भारत खूप मागे आहे. आतापर्यंत देशात १,३४,७२,६४३ लोकांना लस देण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत देशातील ३ कोटी लोकांना लस दिली जाईल. एक मार्चपासून देशातील २७ कोटी ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांना लस देण्यात येणार आहे. भारतात आतापर्यंत ३५ टक्के लसीकरण झालं आहे.