नवी दिल्ली – एका वृक्षाची किंमत १ कोटी रुपये आहे, असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. पण हे खरे आहे. भारतात पहिल्यांदा वृक्षांचे मूल्यांकन झाले असून एका झाडाचे आर्थिक मूल्य वर्षामध्ये ७४ हजार ५०० असते, असे जाहीर करण्यात आले आहे. झाड कोणतेही असो, त्याचे मूल्य दर वर्षी वाढवावे, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने म्हटले आहे.
वृक्षांचे आर्थिकदृष्ट्या मूल्यांकन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, १०० वर्ष जुन्या हेरिटेज झाडाची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. अहवालानुसार एका झाडाची किंमत वर्षाकाठी ७४ हजार रुपये आहे. त्यापैकी एकट्या ऑक्सिजनची किंमत ४५ हजार रुपये आहे आणि जैव खतांची किंमत २० हजार रुपये आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालने रेल्वे ओव्हरब्रिज तयार करण्यासाठी ३५६ झाडे तोडण्यास परवानगी देण्यास सांगितले असता समितीने असे म्हटले आहे की, यासाठी २ अब्ज रुपये खर्च झाले असून, ही रक्कम प्रकल्पाच्या खर्चापेक्षा जास्त आहे. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठाने मोठ्या प्रकल्पांसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने कमी हानीकारक पर्याय अवलंबण्यावर जोर दिला. याबाबत सरन्यायाधीश असेही म्हणाले की, रस्त्यांऐवजी सागरी आणि रेल्वेमार्ग विकसित केले पाहिजेत. सरकारने याचा विचार केला पाहिजे जेणेकरुन झाडे तोडणे कमी होईल.