नवी दिल्ली/मुंबई – ज्येष्ठ नागरिकांनाच कोरोनापासून सर्वाधिक धोका आहे असा समज पहिलेपासून आहे. अख्खे वर्ष आपण याच गैरसमजात काढले. मात्र, दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे सर्वाधिक प्रमाण तरुणांमध्येच आहे, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका संशोधनातून ही बाब पुढे आली आहे.
भारतीय आरोग्य संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि जॉन हॉपकिंग्स विद्यापीठ यांनी एका संशोधनातून असा निष्कर्ष काढला आहे की दुसऱ्यांदा संक्रमण होणाऱ्या रुग्णांमध्ये 79 टक्के रुग्ण हे २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. या वयोगटातील लोक जास्त सक्रीय असतात, त्यामुळे असे होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एपिडेमोलॉजी अँड इन्फेक्शन जर्नलमध्ये हे संशोधन लवकरच प्रकाशित होणार आहे. हे संशोधन गेल्या वर्षी २२ जानेवारी ते ७ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे, हे विशेष. यात १३०० कोरोनाग्रस्त लोकांना नमुन्यादाखल सामील करून घेण्यात आले होते. यातील ४.५ टक्के लोकांना अर्थात ५८ लोकांना १०२ दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा कोरोनाचे संक्रमण झाले आहे.
अर्थात ज्यावेळी १३०० लोकांचे नमुने घेतले त्यावेळी जवळपास ७ लाख कोरोनाग्रस्तांमध्ये १.४ टक्के लोकांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे पुढे आले होते. दुसऱ्यांदा कोरोना झालेल्या एकूण रुग्णांमध्ये ७६.३ टक्के पुरुष आहेत, तर ७८.९८ रुग्ण २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. यात एक आश्चर्याची बाब पुढे आली, ती म्हणजे दुसऱ्यांदा संक्रमण होणाऱ्यांमध्ये ३१.६ टक्के रुग्ण हे आरोग्य क्षेत्रातील आहेत.
या संशोधनाच्या आधारावर आयसीएमआरने असा निष्कर्ष काढला आहे की, दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे प्रमाण तसे फार कमी आहे, पण काळजी घेतली तर त्यातूनही वाचणे शक्य आहे.