नवी दिल्ली – भारतात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. यात महाराष्ट्रातील वाढते रुग्ण सर्वांत मोठे उदाहरण ठरत आहे. ही लाट संपू्र्ण भारतात पसरली तर देशात मोठी वाताहत निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपातील आकडेवारी तर भारतातील दुसरी लाट जास्त धोकादायक ठरेल, असा संकेत देत आहेत.
वैद्यकीय संशोधकांनी तर कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त जीवघेणी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. युरोपसह संपूर्ण देशातील 46 देशांमध्ये द इकॉनॉमिस्ट ने कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा अभ्यास केला आणि त्याचे विश्लेषण केले.
युनिव्हर्सिटी आफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी आफ शिन्हुआ यांनीदेखील अमेरिका आणि युरोपातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण केले आहे. तसेच स्पॅनिश फ्ल्यू आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचेही विश्लेषण करण्यात आले आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे, तिथे जास्त वाताहत झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आता भारतातही कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असून विशेषतः नागपूर आणि अकोलासह काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तसेच पुणे, औरंगाबादमध्ये नाईट कर्फ्यू सुरू झाला आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ आणि इंदोरमध्येही नाईट कर्फ्यू आहे. ही एकूण परिस्थिती बघता भारतात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांचे दिवस परत येणार आहेत असे चित्र निर्माण झाले आहे.
दुसऱ्या लाटेत जास्त मृत्यू
46 देशांमध्ये मार्च ते मे 2020 या कालावधीत 2.20 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दुसऱ्या लाटेत 6.20 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोनाचा ग्राफ
भारतात एका दिवसात 28 हजार 903 रुग्ण आढळल्यामुळे आता संक्रमित लोकांची एकूण संख्या 1 कोटी 14 लाख 38 हजार 734 झाली आहे. यावर्षी एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळल्याची नोंदही झाली.
महाराष्ट्रात भयावह स्थिती
महाराष्ट्रात सातत्याने निर्बंध लावूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बुधवारी तर 23 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले. आता एकूण संक्रमीत लोक 1 लाख 52 हजार 760 आहेत तर 53 हजार 080 लोकांचा मृत्यू झालेला आहे.