नवी दिल्ली ः देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत असून, केरळ आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यात या आठवड्यात कोरोनारुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. केरळ, महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब आणि मध्य प्रदेशात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. सहा राज्यांत ८७ टक्के रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच दिवसात पंजाबमध्ये महाराष्ट्रामध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांएवढे प्रमाण आहे.
कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनची ओळख पटल्यानंतर महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. नव्या स्ट्रेनचा संसर्ग साधारण कोरोना विषाणूच्या तुलनेत अधिक वेगानं होत आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवाडीनुसार, महाराष्ट्रात ४५ हजार ९५६ सक्रिय रुग्ण आहेत. तर १९ लाख ८९ हजार ९६३ लोक उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई आणि विदर्भात आढळलेल्या नव्या स्ट्रेनमुळे अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पाच दिवसात वाढ
देशात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनारुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. कोरोना विषाणू म्यूटेशन प्रक्रियेत असताना रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. देशात शनिवारी कोरोनारुग्णांची संख्या एक कोटी ९७ लाख ७ हजार ३८७ इतकी झाली आहे. त्यातील १३,९९३ रुग्ण शुक्रवारी आढळले आहेत. २९ जानेवारीनंतर कोरोनारुग्णांच्या संख्येत एका दिवसात एवढी मोठी वाढ झाली आहे.
वाढती रुग्णसंख्या अशी
आकडेवारीनुसार, गेल्या पाच दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. १६ फेब्रुवारीला ९,१२१, १७ फेब्रुवारीला ११,६१०, १८ फेब्रुवारीला १२,८८१, १९ फेब्रुवारीला १३,१९३, आणि २० फेब्रुवारीला १३,९९३ रुग्ण आढळले आहेत. राज्यात शुक्रवारी ६,११२ रुग्ण आढळले आहेत. तर केरळमध्ये ४,५८४ रुग्ण आढळले आहेत. मध्यप्रदेशात १३ फेब्रुवारीपासून रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून शुक्रवारी २९७ रुग्ण आढळले. महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर ७५.८७ टक्के इतका आहे.