अडीच महिन्यात प्रथमच
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात एका दिवसात कोरोनाचे २२,८५४ नवे रुग्ण आढळल्यानंतर संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढून १,१२,८५,५६१ झाली आहे. जवळपास अडीच महिन्यांनंतर ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यापूर्वी २५ डिसेंबरला २३,०६७ नवे रुग्ण आढळले होते. देशात १२६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या वाढून १,५८,१८९ झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर
देशात आता १.८९,२२६ लोकांना संसर्ग झालेला आहे. हे रुग्ण एकूण रुग्णांच्या १.६८ टक्के आहेत. आकडेवारीनुसार, एकूण १,०९,३८,१४६ लोक बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६.९२ टक्के आहे. महामारीमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दर १.४० टक्के आहे. देशात गेल्या ऑगस्टमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २० लाख २३ ऑगस्टला ३० लाख आणि ५ सप्टेंबरला ४० लाख झाली होती.
आतापर्यंत एवढ्या नमुन्यांची तपासणी
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनुसार (आयसीएमआर) देशात आतापर्यंत २२,४२,५८,२९३ नमुन्यांची कोरोनासंबंधात तपासणी झाली आहे. यामध्ये ७,७८,४१६ नमुन्यांची बुधवारी तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
गेल्या २४ तासात १२६ पैकी ५४ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यानंतर पंजाबमध्ये १७ आणि १४ केरळमध्ये झाले आहेत. एकूण मृत्यूपैकी सर्वात अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. या महामारीत आतापर्यंत महाराष्ट्रात ५२,६१० लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत १२,५३० आणि कर्नाटकमध्ये १२,३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्र सरकारचा इशारा
देशातल्या नागरिकांनी सतर्क राहून या महामारीविरोधात लढावं, बेजबादारपणा करू नये असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. नियोजन आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी गुरुवारी महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्यानं चिंता व्यक्त केली आहे. कोरोना महामारीकडे सर्वांनी गंभीरतेनं पाहावं असं आवाहन त्यांनी केलं.
नागपूरमध्ये लॉकाडउन
नागपूरमध्ये १५ ते २१ मार्चपर्यंत पूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनदरम्यान कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा खुल्या राहतील. नागपूरमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे १,७१० रुग्ण आढळले. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर इशारा
महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या अचानक वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच काही भागात लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील जे जे रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ते गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते. कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून, लोकांनी याबाबत मनात शंका ठेवू नये, असं आवाहन त्यांनी केलं. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.