नवी दिल्ली – भारतातील कोणत्याही मोबाइल कंपनीने इंटरनेटचा कितीही चांगला स्पीड दिला, तरी जगातील अन्य देशांच्या तुलनेत हा स्पीड अत्यंत कमी आहे. छोटे देशही यात भारताला मागे टाकताना दिसतात.
मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात १३१ व्या क्रमांकावर आहे. ही जानेवारीची क्रमवारी असून, डिसेंबर २०२० च्या तुलनेत यात दोन क्रमांकाने घसरण झाली आहे.
Ookla च्या ग्लोबल स्पीडटेस्ट इंडेक्सने हा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, डिसेंबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात मोबाइल इंटरनेटच्या स्पीडमध्ये भारत १२९ व्या क्रमांकावर होता. तर ब्रॉडबँड इंटरनेटमध्ये भारत जगात ६५ व्या क्रमांकावर आहे.
भारतात डाऊनलोडसाठी ब्रॉडबँडचा सरासरी स्पीड ५४.७३ एमबीपीएस एवढा असतो. डिसेंबरच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये हा स्पीड ५३.९० एवढा होता. तसेच अपलोडिंगच्या स्पीडमध्येही वाढ झाली आहे. डिसेंबर २०२० मधील ५०.७५ एमबीपीएसच्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये हा स्पीड ५१.३३ एवढा आहे.
ब्रॉडबँड स्पीडमध्ये सिंगापूर आघाडीवर
ब्रॉडबँडचा विचार करता २४७.५४ एमबीपीएसच्या स्पीडसह सिंगापूर या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर २२९.४५ एमबीपीएसच्या स्पीडने हाँगकाँग दुसऱ्या तर २२०.५९ एमबीपीएसच्या स्पीडसह थायलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील ब्रॉडबँडचा स्पीड जानेवारीत थोड्या फरकाने वाढलेला दिसतो आहे.










