नवी दिल्ली – मित्र आणि भागीदार देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरवण्याच्या व्हॅक्सिन मैत्री अभियानामुळं भारताची जगभरात स्तुती होत आहे. जगातील अनेक माध्यमांनी या अभियानाची दखल घेतली आहे. संकट काळात अनेक देशांसाठी हात पुढे करणाऱ्या भारताची प्रतिमाही यानिमित्ताने उज्ज्वल होत आहे.
लस पुरवण्याच्या जागतिक स्पर्धेत भारत हा सर्वांत पुढं असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या एरिक बेलमन यांनी सांगितलं. भारतानं त्यांच्या लसीकरण मोहिमेत कोणताही अडथळा किंवा कमतरता येऊ न देता, देशातल्या जनतेला दिल्या त्यापेक्षा तिप्पट प्रमाणात लशी निर्यात केल्या असल्याचं बेलमन म्हणाले.
बेलमन आणि यारास्लाव ट्रोफीमोव्ह यांनी वॉल स्ट्रीट जर्नल याबाबत एक लेख लिहिला असून त्यात भारताला लस महाशक्ती असं संबोधण्यात आलं आहे.
भारताची लस उत्पादन क्षमता अतुलनीय असून त्यांनी आपल्या मित्र देशांना आणि गरजू देशांना स्वदेशात तयार केलेल्या लशीच्या कोट्यवधी मात्रा पुरवल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे.
भारतानं २० जानेवारीला व्हॅक्सिन मैत्री अभियानाला सुरुवात करताना मालदीवला लस पाठवली होती. भारतानं आतापर्यंत नेपाळ, बांगलादेश, म्यानमा, मालदीव, श्रीलंका, सेशेल्स आणि अफगाणिस्तानसह अनेक देशांना लस पुरवली आहे.
जगातली सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये दररोज २५ लाख लशींच्या मात्रांचं उत्पादन होतं. यामुळं भारताची निर्यात क्षमताही प्रचंड वाढली आहे.
व्हॅक्सिन मैत्री अभियानामुळं मित्र देशांना अडचणीत मदत करणारा देश म्हणून भारताची विश्वासार्हता वाढली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.