नवी दिल्ली – हिंदी महासागरातील चीनचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी आता भारताने आक्रमक धोरण स्विकारले आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मोठी रणनिती यशस्वी करणार आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आजपासून दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. त्रिस्तरीय सागरी सुरक्षा सहकार्य या विषयावर आयोजित केलेल्या चौथ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीत ते सहभागी होणार आहेत.
श्रीलंकेचे संरक्षण सचिव आणि मालदीवचे संरक्षण मंत्री या बैठकीत सहभागी होतील. याआधी २०११ ला मालदीव, २०१३ मध्ये श्रीलंका आणि २०१४ ला भारतात अशा बैठकीचं आयोजन झालं होतं.
हिंद महासागर प्रदेशातल्या देशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक हे प्रभावी व्यासपीठ असल्याचं सिद्ध झालं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
या बैठकीबरोबरच दोवाल हे उच्चस्तरीय द्विपक्षीय भेटीही घेण्याची शक्यता आहे.