नवी दिल्ली – हिंदुस्थानी संगीताचे पितामह, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (1922-2011), यांचे जन्मशताब्दी वर्ष 4 फेब्रुवारी 2021 ते 2022 या कालावधीत भारत सरकार त्यांना अभिवादन म्हणून विविध कार्यक्रमांद्वारे साजरे करणार आहे. या जन्मशताब्दी वर्ष सोहोळ्याचा आरंभ या महान गायकावर फिल्म्स डिव्हिजनने तयार केलेल्या, नामांकित कवी व चित्रपटकार गुलजार दिग्दर्शित फिल्मच्या प्रसारणाने होईल. फिल्म्स डिव्हिजनचे संकेतस्थळ व यु-ट्युब वाहिनीवरून या चित्रपटाचे प्रसारण केले जाईल. पुढील वर्षात दूरदर्शन तसेच भारताबाहेरील कार्यक्रमांशिवाय फिल्म्स डिव्हिजनची क्षेत्रीय कार्यालये, गैरसरकारी संस्था व सांस्कृतिक संस्था यांच्या सहकार्याने देशभर या चित्रपटाचे प्रसारण होईल.
पंडित भीमसेन जोशी (73Min./Hindi/1992) हा किराणा घराण्याच्या अलौकिक गायकाचे जीवन व त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला आत्मीय ख्यालगायन, भजन व अभंग तसेच आपल्या अजोड आवाजाने दिलेल्या योगदानाचा आलेख आहे. पंडित भीमसेन जोशी यांनी अनेक चित्रपटांसाठीही गायन केले आहे. अनकही(1985) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उठवली होती. या माहितीपटाचे 4 फेब्रुवारी 2021 ला https://filmsdivision.org/ वर Documentary of the Week म्हणून तसेच https://www.youtube.com/user/FilmsDivision वर 24 तास प्रसारण होईल.