सटाणा – तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाला गळती सुरु झाली आहे. धरणातून गढूळ पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात असून धरण फुटण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. परिसरातील ग्रामस्थांनीही सर्तकतेचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील तळवाडे भामेर येथील ४५ दलघफू क्षमता असलेले धरण १९९४ नंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाला गळती लागल्याने गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. यामुळे धरण फुटण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविली जात आहे. या परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक नागरिकांनी आमदार दिलीप बोरसे यांना माहिती दिली आहे.
आमदार बोरसे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अभियंता अभिजित रौदळ, प्रांतधिकारी विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोकलँड मशीनद्वारे तातडीची उपाययोजना करत सांडवा मोठा करीत धरणातील पाणी कमी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरम्यान, धरण फुटल्याची सोशल मिडियावर अफवा पसरल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.