आदिवासी खऱ्या अर्थाने हिरव्या रानाची लेकरे आहेत. त्यांचे सगळे जीवनव्यवहार निसर्गचक्रावर आधारलेले असतात. शेतीवर अवलंबून असणाऱ्या वारली जमातीला नावच मुळी वारलं म्हणजे जमिनीचा तुकडा यावरून मिळाले आहे. जमिनीच्या तुकड्यावर उदरनिर्वाह करतात म्हणून त्यांना वारली म्हटले जाते. भात हेच त्यांचे प्रमुख पीक व उत्पन्नाचे साधन होय. भातशेतीत रमणाऱ्या वारल्यांच्या चित्रणांमध्ये तोच विषय मुक्तहस्ताने रंगवलेला दिसतो. त्यासाठी रंग म्हणूनही तांदळाच्या पिठाचाच वापर केला जातो. वारली चित्रशैलीचा भातसंस्कृतीची कला म्हणून उल्लेख होतो तो गौरवानेच म्हटला पाहिजे.
संजय देवधर
ठाणे जिल्ह्यापासून गुजरातच्या सीमेपर्यंत आदिवासी वारली जमात पसरलेली आहे. पालघर, डहाणू , तलासरी, जव्हार, मोखाडा तसेच दीव – दमण व दादरा – नगरहवेली या केंद्रशासित भागातील सिल्व्हासा परिसरात दुर्गम पाड्यांवर वारली जमात रहाते.प्रत्येकाचा शेतीचा छोटासा तुकडा असतो. त्याजवळ झोपडी बांधून ते राहतात. पाच पंचवीस झोपड्यांचा पाडा बनतो. चार – पाच पाडे मिळून गाव होते. तांदूळ – भात हेच त्यांचे मुख्य पीक ! त्याच्या जोडीला रायभात, राळा, नाचणी, उडीद ही पिके ते घेतात. याशिवाय इतर छोटी पिके व रानभाज्या पिकवतात. साधारणपणे जूनच्या प्रारंभी पेरलेले भात सप्टेंबर अखेरीस तयार होते. जुलैतील पेरणी ऑक्टोबरमध्ये पिकते. एकूणच दिवाळीपूर्वी नविन भात घरात येते. ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या वारली चित्रशैलीत भातशेती या विषयावर मुबलक प्रमाणावर चित्रण केलेले आढळते. त्यामागे शेतीविषयक श्रद्धा, आदर, आस्था या भावना असतात. या तरल चित्रांमधून त्यांच्या सूक्ष्म निरिक्षणशक्तीचा प्रत्यय येतो. जमिनीचा राब करण्यापासून ( जमीन भाजणे यालाच राब करणे असे म्हणतात ) शेतीची कामे सुरू होतात. भाजलेली जमीन एकदा मृत होते व पेरणी केल्यावर पुन्हा जिवंत होते असे ते मानतात. राब करण्याचे कामही ही आदिवासी जमात करीत असल्याने देखील त्यांना वारली हे नाव पडले.
वारली जमातीच्या आहारात भातच प्रामुख्याने असतो.नागलीची पेज, भाकरी आवडीने खाल्ली जाते. त्यासोबत रानभाज्या उकडून मीठ – मिरची घालून खातात. तुरीऐवजी उडदाचे वरण करतात. बऱ्याचदा उडदाचे पिठलेही केले जाते. याशिवाय मासे, खेकडे आहारात असतात व मांसाहार करतात. अतिशय साधी, कमीतकमी गरजा असणारी जीवनशैली त्यांनी खुशीने अंगिकारली आहे. प्रत्येक वारली झोपडीत वर्षभराचे तांदूळ मोठमोठ्या कणगीत भरून ठेवतात. कणगी म्हणजे बांबूच्या मोठ्या टोपल्या. एक माणूस त्यात सहज उभा राहू शकेल इतक्या मोठया आकाराच्या या कणग्या असतात. याखेरीज झोपडीत बांबूची सुपे, टोपल्या, चटया तसेच धान्य दळण्यासाठी जाते असे मोजकेच साहित्य असते. ही जाती देखील वैशिष्टयपूर्ण व भव्य आकारांची आसतात. एकावेळी दोन महिला मिळून त्यावर धान्य दळतात. उखळ, मुसळ, पीठ साफ करण्यासाठी छोटा कुंचा देखील असतो. भातशेतीच्या चित्रात शेताच्या मशागत नांगरणीपासून भात पेरणी, लावणी, आवणी, निंदणी, शेताची राखण, पिकांची निसवणी कापणी, मळणी, झोडपणी, भाताची रास, सोंगणी, धान्यभरणी, धान्याची वाहतूक हे सारे प्रसंग टप्प्याटप्प्याने रेखाटलेले दिसतात. बऱ्याचदा एकाच चित्रात या सगळ्या घटना क्रमाने रंगवल्या जातात. भात पिकले की प्रथम धान्याची, कणसरी मातेची पूजा केली जाते. यावेळी सुगीचा आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रभर तारपा नृत्य करण्यात येते. नंतर तारप्याच्या सुरावटीत व ढोलाच्या ठेक्यावर वाजतगाजत भात घरी नेतात.नवतीचा सण साजरा करून शिवारातील देवदेवतांना नव्या भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो.त्यानंतरच ते नव्या भाताचा पहिला घास खातात.
पावसाळ्याच्या दिवसात आपण घोटी – इगतपुरी भागात गेलो तर विलक्षण दृष्य दिसतं. सर्वत्र भात पेरणीपासून विविध प्रकारच्या कामांची लगबग सुरु असते.भर पावसात गुढगाभर चिखलामध्ये डोक्यावर बांबूचे इरले घेऊन कृषिवल कामे करतात. सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात भातशेती जवळून जाताना भाताचा सुगंध मोहित करतो.वारली चित्रांमध्ये भातशेतीबरोबरच खाचरातील बेडूक, खेकडे, साप, जलचर तसेच विविध प्राणी, पक्षी यांची बहारदार रेखाटने केलेली आढळतात. कधी वारल्यांकडे जाण्याचा योग आला तर उत्तम आदरातिथ्य होते. पाहुणचार करताना आग्रहाने भात खाऊ घालतात. चित्रसहल या माझ्या उपक्रमाद्वारे मी अनेक कलाप्रेमींना आदिवासी वारली पाड्यांवर घेऊन जातो. प्रत्यक्ष भेटून त्यांची कलाप्रात्यक्षिके बघता येतात. त्यांच्या पद्धतीच्या भोजनाचा आस्वाद घेताना भात, उडदाचे वरण, नागलीची भाकरी, उडदाचे पिठले,मिरचीचा ठेचा असा बेत असतो. चुलीवरचे हे गरमागरम पूर्णब्रह्म संपूर्ण समाधान देते. बहुतेक वारली आपल्या शेतात हायब्रीड बियाणे वापरत नाहीत. परंपरेने जतन केलेले बियाणे पेरले जाते व पुढील वर्षांसाठी साठवूनही ठेवले जाते. कोणत्याही खतांचा वापर न करता केवळ सेंद्रिय शेती करण्यात येते. गावठी पालेभाज्या, रानभाज्या, वेगवेगळ्या भाज्यांचे वेल झोपडीजवळ वाढवले जातात. तारपा वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या दुधीभोपळ्याचे वेल अनेक ठिकाणी दिसतात. दुधीभोपळे वाळवून, कोरून तारपा हे वाद्य तयार केले जाते. तारप्याच्या सुरावटीवर वारली जमात रात्ररात्र नृत्यात रंगून जाते. लोकप्रिय ठरलेल्या भातसंस्कृतीच्या या वारली कलेने जगभरातील कलाप्रेमींना मोहिनी घातली आहे.
(लेखक वारली अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. संपर्क- ९४२२२७२७५५)