पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – सहा वर्षांपासून मागणी करूनही भाडेवाढ केली नसल्याने पिंपळगाव बसवंत ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने मंगळवार (८ सप्टेंबर) पासून संपाचे हत्यार पुकारले आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. येथील जुन्या मार्केट यार्डात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने कांदा व्यापारी असोसिएशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दर तीन वर्षांनी भाडेवाढ करण्याचे ठरले होते. डिझेलचा भाव ४५ रूपये असताना जे भाडे मिळत होते तेच भाडे आता दिले जात आहे. सध्या डिझेलचा दर ८० रुपयांवर गेला असतानाही पुर्वीचेच भाडे व्यापारी असोसिएशन देत आहे. त्यामुळे चालक-मालक संघटनेचे मोठे नुकसान होत असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी ट्रक-टेम्पो असोसिएशनचे पदाधिकारी शांताराम खरात, जगदीश कोठाळे, बाळासाहेब घुमरे, फईम सय्यद, राजू सय्यद, कैलास रिकामे, सचिन गिते, दौलत विधाते, अण्णा सोनगिरे, अरूण खैरनार, वसंतराव निकम, रामदास कोठुळे यांच्यासह असंख्य चालक, कामगार उपस्थित होते.
दररोज दोन लाखांचे नुकसान
ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेचे ११५ ट्रक आहेत. दररोज एका वाहनामागे २ हजार याप्रमाणे दोन लाखांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे संप काळात परिसराला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
फेरी ठिकाण – जुने भाडे -वाढीव भाडे मागणी
1) कुंदेवाडी- १८०० – २४००
2) खेरवाडी- १८०० – २४०० (टोल)
3) सुकेणा- १८०९ – २४०० (टोल)
4) लासलगाव- २८०० – ३४००
5) मनमाड- ३९०० – ४५००
6) येवला- ४००० – ४६००
7) नगरसूल- ४५०० – ५१००
8) नाशिकरोड- ३१५० – ३६५० (टोल)
गेल्या सहा वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आलेली नाही. ४५ रुपये डिझेलचा दर असताना जे भाडे मिळत होते तेच भाडे आता दिले जात आहे. त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. मागणीप्रमाणे कांदा व्यापारी असोसिएशनने पूर्तता न केल्याने मंगळवारपासून संप पुकारण्यात आला आहे.
– जगदीश कोठाळे, पदाधिकारी, ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटना