कोलकाता ः पश्चिम बंगालमध्ये जर भाजपचं सरकार आलं तर राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे. त्यात बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिलेल्या संकेतामुळे भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा शोध पूर्ण झाल्याचं स्पष्ट होत आहे. बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्यास जो निवडणूक लढणार नाही, त्यालाच मुख्यमंत्री बनवलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. घोष यांच्या वक्तव्यानंतर भाजप त्यांनाच मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबतचा निर्णय पक्षच घेणार आहे. परंतु आमदार असलेलाच व्यक्ती मुख्यमंत्री होईल, हे गरजेचं नाही. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या तेव्हा त्या आमदार नव्हत्या, असं घोष म्हणाले. २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांची सत्ता उलथवली तेव्हा त्या लोकसभेत खासदार होत्या. निवडणुकीनंतर त्या भवानीपूर जागेवर निवडून आल्या. त्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती.
पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आपला विजय होईल, असा भाजपलाच विश्वास आहे. तृणमूल काँग्रेस आणि त्यांचे नेते चिंतीत आहेत. निवडणूक जशीजशी पुढे सरकेल तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पराभवाची जाणीव होईल, असं घोष यांनी म्हटलं आहे. घोष यांच्या वक्तव्यानंतर तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. दिलीप घोष सर्वांना परिचित असून मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. आणि ते निवडणूक लढवत नाहीत.
पंतप्रधानांनी केली होती स्तुती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान खडगपूरच्या सभेत दिलीप घोष यांची स्तुती केली होती. तेव्हापासूनच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दिलीप घोष असतील अशी चर्चा सुरू झाली होती.