कोलकाता – विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच बंगालमध्ये निवडणुकीचा प्रचार वेगानं होत आहे. निवडणूक प्रचार करण्याबाबत भाजपनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर व्यक्तिगत टीका करायची नाही, असा निर्णय भाजपनं घेतला आहे.
भाजप आपलं लक्ष सकारात्मक प्रचारावर केंद्रित करणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराबाबत घेतलेल्या या निर्णयाची सार्वजनिक सभा आणि प्रचारफेरींमध्ये प्रत्यक्ष अंलबजावणीसुद्धा होत आहे. त्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्याऐवजी विकासाच्या मुद्द्यावर बोललं जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की ते केवळ सकारात्मक प्रचार करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांबाबत बंगालच्या नागरिकांना सांगितलं जाणार आहे. मोदी सरकारनं राज्यासाठी विविध विकासकामे केली आहेत. परंतु ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं केंद्राच्या अनेक योजनांचं काम रोखल्याचं सांगितलं जाणार आहे.
मोदी सरकारकडे मतदारांना सांगण्यासारखं बरंच काही असताना विरोधी पक्षांबद्दल बोलण्यात वेळ घालवण्यात काय अर्थ आहे, असा सवाल भाजपच्या एका नेत्यानं केला. ते म्हणाले, की आम्हाला मोदी सरकारच्या सरकारी योजनांवर लक्ष केंद्रित करताना बंगाल सरकारच्या कमतरता दाखवून द्यायला हव्या. व्यक्तिगत टीका करणं प्रतिस्पर्ध्यांना सहानुभूती मिळवण्यास फायदेशीर ठरू शकतात, असं भाजपचं मत आहे. तेव्हा दुखापतग्रस्त ममता बॅनर्जी व्हिलचेअरवर बसून निवडणूक प्रचार करत असून, सहानुभूती मिळवण्याची एकही संधी सोडत नाही आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याबाबत बोलू नये असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून बंगालच्या प्रदेश कार्यकारिणीला सांगण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या विरोधाभासी वक्तव्यांमुळे हल्ल्याबाबतचं सत्य समोर आल्यामुळे त्याबाबत बोलू नये, असं नेतृत्वानं सांगितलं होतं.