राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी.नड्डा करणार मार्गदर्शन
मुंबई ः महाराष्ट्रातील नवनिर्वाचित पक्ष पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक ही सोमवार दिनांक २७ जुलै रोजी होणार आहे. यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे व्हर्च्युअल माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती प्रदेश भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा हे सोमवार दिनांक २७ जुलै रोजी नवनियुक्त प्रदेश कार्यकरणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत. भाजपाच्या मुंबईतील दादर येथील वसंतस्मृती या कार्यालयात सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वसंतस्मृती कार्यालयातून संबोधित करतील. तसेच मुंबई परिसरातील भाजपाचे पदाधिकारी दादर येथील वसंतस्मृती येथे उपस्थित राहणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यातील अन्य भाजपा खासदार, आमदार यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी आपापल्या ठिकाणाहून सहभागी होणार आहेत. प्रारंभी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बैठकीत प्रास्ताविक करतील. यावेळी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाचे मुंबईत असणारे पदाधिकारी उपस्थित राहतील तर अन्य ठिकाणी असणारे पदाधिकारी आपआपल्या ठिकाणाहून ऑनलाईन पध्दतीने बैठकीत सहभागी होतील. चंद्रकात पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर नड्डा यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर भाषण होईल. यानंतर विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडला जाईल व या बैठकीचा समारोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे करतील.