नाशिक – मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्यावतीने रामकुंडाच्या ठिकाणी शनिवारी (२९ ऑगस्ट) घंटानाद आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. मंदिरे सुरू करुन सर्वसामान्य आणि भाविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यभरात दारुची दुकाने सुरू आहेत आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे का बंद आहेत, असा सवाल यावेळी करण्यात आला. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर आणि रामकुंडाच्या ठिकाणी “दार उघड उद्धवा दार उघड, धार्मिक स्थळांचे दार उघड” अशी याचना यावेळी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, महंत सुधीर पुजारी, महंत भक्ती चरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, हिंदू एकताचे रामसिंग बावरी आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.