नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून सध्या केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्ष म्हणून कार्यरत आहे. भाजपचा स्थापनादिन ६ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. याचनिमित्त पंतप्रधान मोदी हे देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मोदी ऑनलाईन मार्गदर्शन करणार असून त्याचे थेट प्रसारण पक्षाच्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि इंटरनेट मीडिया द्वारे केले जाईल.
भाजप स्थापना दिनानिमित्त पक्षाचे कार्यकर्ते देशातील सर्व केंद्रांवर पक्षाचे तत्वज्ञान, संस्कृती आणि धोरणांवर संवाद सत्र आयोजित करणार असून यावेळी पंतप्रधान मोदी आणि जे.पी.नड्डा कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
६ एप्रिल १९८० रोजी पूर्वीच्या जनसंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानीं भाजपाची स्थापना केली होती, तसेच १९८४ मध्ये पक्षाने प्रथम लोकसभा निवडणूक लढविली तेव्हा केवळ दोन जागा जिंकल्या, परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत हा पक्ष अधिक मजबूत झाला. लोकसभेत सध्या या पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे.
भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या माध्यमातून पक्ष वाढला आणि आज पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक राज्यात विजय मिळवला आहे. सुमारे ४० वर्षांच्या इतिहासात या पक्षाने यापूर्वीही सत्ता मिळविली होती, परंतु आज भाजप संघर्षाच्या युगातून बाहेर पडून सत्तेच्या शिखरावर आहे.