सटाणा – शहरापासून जवळच असलेल्या भाक्षी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी ए एस कोल्हे यांना बुधवारी (१९ ऑगस्ट) घेराव घातला. गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर तुडूंब भरलेली असतांनाही गेल्या दहा दिवसांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायत परिसरातील वीजेचे दिवे बंद आहेत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात आरोग्याची एैशी तैशी झाल्याच्या कारणावरुन ग्रामस्थ आक्रमक झाले.
भाक्षी हद्दीतील शरद नगर, फुले नगर, रामनगर आदी परिसरात ऐन पावसाळ्यात गत दहा दिवसांपासून ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना उन्हाळ्याप्रमाणेच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रस्ता ओलांडून सटाणा नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिंकाकडून पाणी भरावे लागत आहे. तसेच या नववसाहतीमधील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. ग्रामसेवक यांचेकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतलेली नाही. परिसरात पावसाच्या पाण्यामुळे डबके साचून आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून थेट घरांमध्ये घुसत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कोल्हे यांना घेराव घातला. समस्या तत्काळ दूर करण्याचे निर्देश कोल्हे यांनी दिले. तेव्हा ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या प्रसंगी सरपंच पुनम सुर्यवंशी, उपसरपंच सौरभ सोनवणे, भास्कर पाटील, योगेश सुर्यवंशी, संदीप बागुल, मनोज पिंगळे, दीपक महिरे, नाना वनीस, दिलीप उशीरे, योगेश पवार, अरूण देवरे, प्रशांत खरे, निलेश खैरणार, अश्विनी बागुल, निर्मला गायकवाड, आदींसह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.