मुंबई – ओरिसातील कालाहांडी या गावातील एक अजब गजब घटना पुढे आली आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेवाला मांडवात सोडून नवरी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर पळून गेली. याचा परिणाम असा झाला की नवरदेवाचे लग्न नवरीच्या १५ वर्षाच्या लहान बहिणीसोबत लावून देण्यात आले. प्रकरण पुढे आल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या घरी परत आणले.
पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की नवरी आपल्या २६ वर्षाच्या होणाऱ्या नवऱ्याला मांडवात सोडून पळून गेल्यानंतर हे नाटक सुरू झाले. अश्या परिस्थितीत नवरीच्या अल्पवयीन मुलीला लग्नासाठी तयार करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नाही, असे तिच्या कुटुंबियांना वाटले.
कालाहांडी बालसंरक्षण अधिकारी सुकांती बेहरा यांनी सांगितले की जिचे लग्न लावून देण्यात आले ती मुलगी अद्याप १०वीच्या परीक्षेची तयारी करीत आहे. तिला या बंधनातून मुक्त करण्यात आले आहे आणि भावाकडे आणून सोडले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे मुलाच्या व मुलीच्या कुटुंबियांना बालविवाह लावून देणे बेकायदेशीर आहे, हे माहितीच नव्हते. बालविवाह लावून दिल्यास गुन्हे दाखल होऊन तुरुंगवास होऊ शकतो, याचीही माहिती त्यांना नव्हती. या अल्पवयीन मुलीने स्वतःच आपल्या आई–वडिलांकडे राहण्याचा व परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबांसाठी समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अज्ञानातून गुन्हा घडल्याने त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही व त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आलेली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांना विचारले असता एका मित्राच्या सांगण्यावरून दडपणात येत लहान मुलीचे लग्न लावून दिले, अशी कबुली त्यांनी दिली.