बीजिंग – चीनची राजधानी बीजिंगमधील लोकांसाठी आज सोमवारचा दिवस भयानक ठरला , कारण सकाळपासून बीजिंगमधील दाट पिवळ्या धुळीच्या लोटांनी अनेकांचे डोळे लालीलाल झाले आहेत.
मध्य मंगोलिया आणि वायव्य चीनच्या इतर भागात जोरदार वारे वाहत असल्याने बीजिंगमध्ये या वर्षातील सर्वात मोठे आणि भयानक वाळूचे वादळ दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण बिजिंग शहर अचानक पिवळे पडले.
चीनच्या हवामानशास्त्र संस्थेने त्याला या दशकात सर्वात मोठे वाळूचे वादळ म्हटले आहे. ज्यामुळे येथील परिस्थिती भयावह दिसत आहे.

चीन हवामान प्रशासनाने सोमवारी सकाळी यलो सॅन्डस्ट्रॉर्मचा इशारा जाहीर केला होता , वाळूचे वादळ मंगोलियापासून बीजिंगच्या सभोवतालच्या गांसु, शांक्सी आणि हेबेई प्रांतांमध्ये पसरले आहे. शेजारील मंगोलियामध्येही जोरदार वाळूचे वादळ धडकले. यात किमान ३४१ जण बेपत्ता झाले. इनर मंगोलियाची राजधानी होहोत येथून विमान उड्डाणे थांबविण्यात आली आहेत.
बीजिंग शहरात जेव्हा लोक सकाळी रस्त्यावर आले, तेव्हा येथील दृश्य आणि हवामान बदलले होते, लोक रस्त्यावरुन सायकलने जात होते, तेव्हा समोर काहीच दिसत नसल्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागला.










