कोरोनाचे मृत्यू पाचशेच्या उंबरठ्यावर : रिकव्हरी असली तरी वाढ चिंताजनक
नरेश हाळणोर
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ मार्चला सापडला आणि आरोग्यासह शासकीय यंत्रणेची एकच धावपळ उडाली. गेल्या साडेचार महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा १५ हजारांवर पोहोचला, कोरोनामुळे ४९९ रुग्ण बळी गेले आहेत. मात्र, अजूनही ‘भय इथले संपत नाही’ अशीच स्थिती आहे.
जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात कोरोना विषाणूचा मालेगाव शहरात अक्षरशः कहर होता. त्यावेळी नाशिक शहरात अगदीच नाममात्र रुग्ण होते. त्यावेळी याच नाशिकमधील संकुचित लोकप्रतिनिधींनी मालेगावातील कोरोना रुग्णांना नाशिकमध्ये उपचारासाठी आणण्यालाच विरोधाचा गळा काढला. मात्र, आजमितीस, फक्त नाशिक शहरात १० हजार रुग्ण आहेत. नाशिकचे तेच काळजीवाहू लोकप्रतिनिधी वॉर्डावॉर्डांत रॅपिड चाचण्या करीत नागरिकांच्या भीतीत आणखी भर घालत आहेत.
…
भीती अन् संशयाचे धुके
जिल्ह्यात दिवसाला बाधित रुग्णांचा वाढता वेग पाहता, तो कधीही हजाराचा आकडा गाठू शकेल अशीच शक्यता आहे. सध्या दोन ते तीन दिवसांत हजार रुग्ण वाढतात. यामुळे नागरिकांमध्ये भीती असली तरीही उद्भवलेल्या रोजगाराची समस्याच त्याहीपेक्षा अधिक भीतीदायक आहे. एकीकडे कंपन्या सुरू केल्या, पण प्राॅडक्शन नाही. ऑर्डर वाढत असतानाच कंपन्यांमध्ये कामगार पॉझिटिव्ह मिळू लागल्याने कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे कोरोनाच्या भीतीपोटी शासन घराबाहेर पडू देईना तर पोटासाठी घराबाहेर पडणा-यांना कोरोना जगू देईना अशी स्थिती आहे. दुसरीकडे, शहरभर रॅपिड टेस्टचे पेव फुटले आहे. या आणि करा मोफत टेस्ट, किती भरवशाची याबाबत शंकाच. अनेकांच्या रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांनी पुन्हा प्रयोगशाळेत टेस्ट केली असता त्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे रॅपिड टेस्टही नाशिककरांची भीती घालविण्यापेक्षा वाढविणारी ठरते आहे.
रिकव्हरी भारी पण…
कोरोना रुग्णाचा रिकव्हरी रेट ७७ टक्क्यांपेक्षा अधिक असला तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णवाढीचे प्रमाण भीती वाढविणारेच आहे. आतापर्यंत १४ हजार ४१६ पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले असताना ११ हजार १२७ रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. मात्र, दिवसाकाठी शेकड्याने वाढवणारी रुग्णसंख्या भयकारीच आहे.