या बाल वैज्ञानिक कन्येने लावलेला हा नवीन शोध चर्चेचा विषय बनलेला आहे. या चष्म्या च्या पेटंट करीता अर्जदेखील केला गेलाय. नेत्रतज्ञांच्या मते सर्व परीक्षण आणि चाचण्यांमध्ये खरा उतरल्यानंतर हा चष्मा सामान्य लोकांच्या वापरात येणे शक्य आहे. दिगान्तिकाच्या मते तिच्या डोक्यात आलेल्या नवीन कल्पनेतून हा चष्मा साकार झालाय. हा चष्मा बनवण्यासाठी तिला केवळ १०० रुपये खर्च आला. चष्म्याची संकल्पना अतिशय साधी आणि सोपी आहे. कार किंवा दुचाकीना असतात तसे दोन अतिरिक्त काच चष्म्याच्या दोन बाजूंना जोडून त्यांच्या माध्यमातून मागचे दृश्यसुद्धा मागे न वळता पाहता येणे शक्य आहे.
सामान्यतः जेव्हा आपल्याला मागचे दृश्य बघायचे असते तेव्हा आपल्याला मान किंवा संपूर्ण शरीर मागच्या बाजूला वळवून बघावे लागते. हा चष्मा घातला की आपल्याला मागे वळायची गरज नाही. खास करून जंगल क्षेत्रातून जात असताना मागून येणाऱ्या जनावरांवर नजर ठेवण्यासाठी हा चष्मा अतिशय उपयोगी ठरू शकेल. दिगान्तिकाच्या मनात सुध्दा या चष्म्याची कल्पना तेव्हाच आली जेव्हा ती सुंदरबनच्या जंगलात भेट देण्यासाठी गेली होती. तिच्या मते जंगलात भ्रमंती करताना नेहमी मागून कुणी जनावराने हल्ला करण्याची भीती असते. मागून आपल्या डोळ्यांनी आणि मान वळवून देखील केवळ १२४ डिग्री च्या कोनात असलेल्या वस्तूंनाच बघू शकतो. मात्र प्रस्तुत चष्मा घातल्यास १२४ अंशाहून कितीतरी जास्तच्या कोनात घडत असलेल्या घटनांवर लक्ष ठेवणे शक्य आहे.