नाशिक – अन्न व औषध प्रशासनाने जुने नाशिक परिसरातील कथडा भागात टाकलेल्या छाप्यात अडीच लाख रुपयांचा तंबाखू जन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाज काफील शेख (३२, रा. पठाणपुरा, चव्हाटा) असे तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेलेल्या संशयीताचे नाव आहे. एफडीएला मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी (दि.२१) हा छापा टाकण्यात आला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमरधाम रोडवरील उस्मानिया टॉवर मधील उस्मानिया ट्रेडर्स दुकानाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या खोलीची पथकाने तपासणी केली असता तेथे पानमसाला व सुंगधित तंबाखूचा साठा मिळून आला. घटनास्थळावरून सुमारे २ लाख ६४ हजार ३८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी संशयीताविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक विभागाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंखे व अन्न विभागाचे सहायक आयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर. डी. सुर्यवंशी, अमित रासकर, पी. एस. पाटील आदींच्या पथकाने केली.