वर्धा – आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो यांचे मंगळवारी (ता.४) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केळझर मधील धम्मराजिक महाविहार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलिसांनी बंदुकीच्या ३ फेरीने त्यांना मानवंदना दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी पोलीस विभागाच्या वतीने आणि अचलीत कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. भदंत धम्मसेवक महाथेरो डॉ. एम सत्यपाल करुनानंदन ज्ञानरक्षक यांनी चितेला मुखाग्नी दिला. नागपूरहून त्यांचे पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटून पाठविण्यात आले होते. तो तिरंगा भारतीय बुद्ध सेवासंघाचे सचिव पी एन खोब्रागडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार सोनवणे तसेच बुद्ध धम्माचे भन्ते सत्यशील धम्मसेवक महाथेरो, डॉ उपगुप्त महाथेरो, डॉ के एम महाथेरो आदी मान्यवर उपस्थित होते.
नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झालेल्या दीक्षा सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत भदन्त सदानंद महाथेरो यांनी सुद्धा धम्म दीक्षा घेतली होती. त्यावेळी धम्म दीक्षा घेतलेल्या चार भिक्खुंपैकी हे एक होते. भन्ते सदानंद यांनी साठवर्षांपासून भारतासह जगातील विविध देशात बौद्ध धम्माच्या प्रसार व प्रचार कार्यात मोलाची भूमिका वठवली. सिद्धहस्त लेखक म्हणून भदंत सदानंद यांनी धम्म या विषयावर विपुल लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या एकूण १८ ग्रंथांमध्ये मिलिंद प्रश्न, बुद्धगया मुक्ती, अनागारिक धर्मपाल, बुद्धाचे धम्मदूत आणि बौद्ध संस्कार पाठावली ही काही उल्लेखनीय पुस्तके आहेत.
भदन्त सदानंद महाथेरो यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९३९ रोजी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील इटगाव (कुर्झा) येथे गणवीर कुटुंबात झाला होता. त्यांची प्रवज्या व उपसंपदा भदन्त डी. सासनश्री यांच्या हस्ते महाबोधी विहार, सारनाथ येथे झाली होती. १९६६ मध्ये वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे विहारभूमीसाठी बेमुदत उपोषण करून धम्मराजिक महाविहार निर्मिती करून भारतीय बौद्ध सेवा संघ ही संस्था स्थापन केली. ते संघानुशासक होते. १९८१ ला पाली विनय मुखोद्गत केल्याबद्दल बंगालमधील बिनागुंडी येथे त्यांना सद्धम्मादित्य उपाधीने विभूषित करण्यात आले होते.