हानले (लडाख)
आपल्या हटके पर्यटनस्थळांच्या यादीत आवर्जून समाविष्ट करायलाच हवे असे Offbeat Destination म्हणजे हानले! लडाख मधील भारत-चीन सीमारेषेवरील ऐक छोटसं गाव. लेह-लडाखमधील इतर गावांप्रमाणेच साधसुधं. स्वच्छ असे हे गाव आहे. मात्र, हे गाव आपल्याला आणि जगाला माहित असणे याचे एकच कारण म्हणजे येथे असलेली अंतराळ संशोधन करणारी वेधशाळा म्हणजे हानले आब्झर्वेटरी.
जगातील सर्वात उंचावर असलेल्या वेधशाळांपैकी एक असलेली ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही वेधशाळा भारताच्या एका कोपर्यात इतक्या दुर्गम भागात का बरं बनवली असेल? तिचं कामकाज इतक्या दुरवरुन कसे चालत असेल? तर ही वेधशाळा आणि हानलेमधे १७ व्या शतकात उभारलेली माॅनेस्ट्री या दोन्ही गोष्टी जितक्या अचंबित करणार्या आहेत तितकच या गावाच्या माथ्यावर रोज हजारो तार्यांनी सजणारं आकाशसुद्धा! तर जगाच्या एका छोट्याशा कोपर्यात लपलेल्या या जादूई दुनियेची सफर आपण करुयात.
हानले ही दरी हानले नदीपासून बनली आहे. पुढे ही नदी इमिसला पास करुन लोमा या गावात सिंधू नदीला मिळते. जिथे भारत आणि तिबेटची सिमा आहे. हानलेला जाण्यासाठी लेह येथून पेंगोंग मार्गे जाता येते. पेंगोंग-चुसुल मार्ग आहे. ब्रीज वरुन पुढे काकसांगला पास या भागातून हानलेला जाता येते. मात्र हा रस्ता अतिदुर्गम भागातून जातो. पुढे त्सो मोरीरी हा एक तलाव (लेक) आहे. तोही परिसर नयनरम्य आहे. यासाठी येथे फिरतांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)चे आपण आभार मानू तितके कमीच आहेत.
हानले गाव समुद्रसपाटीपासून जवळ जवळ ४५०० मीटर म्हणजेच १४ हजार ७६४ फुट उंचीवर वसलेलं हे गाव आहे. हे सर्व तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हाच अनुभवाल. येथे जाण्याचा अजून एक अतिशय सुंदर मार्ग म्हणजे मनाली-लेह. हा मार्ग नवीनच सुरु झालेल्या अटल टनेलमधूनच जातो. आता तर येथे या मार्गावर पूर्ण बर्फाची चादर पसरलेली असते. या परिसरातील प्रवासही एक खुप सुंदर अनुभव आहे. या संपूर्ण परिसरात फिरतांना स्थानिक गावकर्यांची कामासाठी चालणारी लगबग, बायकांची ओझी घेऊन फिरतांना सोबत तान्हुल्यालाही सांभाळणे, लहान लहान, गोरी गोमटी, लाल गोबरे गाल असलेली शाळेत जाणारी मुले, सदैव हातावर विणकाम करणार्या वयस्कर बायका, हे सर्व मन मोहवून टाकतात. येथे जगण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. पण तो त्रास कुणाच्याही चेहर्यावर दिसत नाही. मात्र एक गोष्ट सदैव जाणवते ती म्हणजे ही मंडळी एका वेगळ्याच जगात राहतात. चला तर मग अशा भारतात जाऊया जो आपल्याला अगदीच वेगळा भासेल.
राहण्याची सोय
या दुर्गम भागात जेमतेम ३०० लोकसंख्या आहे. त्यामुळे येथे हाॅटेल्स नाही.त पण होम स्टे सुंदर आहेत. लडाखी लोक कसे शांतता प्रिय आहेत याच दर्शन इथे होतं.
केव्हा जाल
हानले येथे जाण्यासाठी जून ते सप्टेंबर हाच कालावधी योग्य आहे. बाकी इतर ८ महिने हा रस्ता बर्फाच्छादित असतो. जुलै व ऑगस्ट महिना येथे उन्हाळा असतो. या काळातही येथील सर्वाधिक तापमान ७/८ अंश सेल्सियसच्या वर जात नाही. अशा या हटके ठिकाणची सहल करायला तुम्हाला नक्कीच आवडेल.