श्री क्षेत्र प्रयागतीर्थ, घोरवड (ता.सिन्नर)
नाशिक परिसरामध्ये असंख्य पर्यटनस्थळे आहेत. काही दुर्लक्षित आहेत तर काहींना खऱ्या अर्थाने पर्यटकांची प्रतिक्षा आहे. अशाच पर्यटनस्थळांची ही ओळख…..
प्रभू श्रीराम चंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र श्री जटायू आणि रावण यांचे युद्ध झाले. त्या युद्धात रावणाने जटायूंचे पंख छाटले व जटायू घोरवड या ठिकाणी पडले. घोरवड हे छोटेसे गाव सिन्नर तालुक्यात असून सिन्नर- घोटी रस्त्यावर आहे…
असा आहि इतिहास
रामायण काळात जटायू हे सरपटत सरपटत श्रीक्षेत्र टाकेद (ता. इगतपुरी) पर्यंत गेले. श्री प्रभूराम याठिकाणी आल्यावर त्यांना जटायूंचे पंख मिळाले. त्यानंतर प्रभू श्रीराम टाकेद येथे गेल्यावर तेथे त्यांची व जटायू यांची भेट झाली. जटायू यांनी प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेऊन प्राण त्याग केला. नंतर प्रभू श्रीराम चंद्रांनी जटायू यांना मोक्ष मिळावा यासाठी सर्व तीर्थांचे जल मागविले, प्रभूंच्या आज्ञेने सर्व ठिकाणचे तीर्थ आले. पण या घटनेने सर्वतीर्थांचा राजा प्रयागराज यांना गर्व व अभिमान झाला व मी गेलो नाहीतर प्रभू माझ्यासाठी थांबून राहतील, असे त्यांना वाटले. परंतु लक्ष्मणाने लगेच बाण मारून प्रयाजाचे जल याठिकाणी काढले आणि सर्व तिर्थांचे जल घेऊन प्रभू श्रीराम यांनी जटायूंचा मोक्षविधी पूर्ण केला. प्रभू श्रीराम चंद्र श्रीक्षेत्र प्रयाग तिर्थ येथे एक दिवस वास्तव्यास राहिले नंतर श्रीक्षेत्र टाकेद येथे गेले. श्रीक्षेत्र टाकेद येथे सुद्धा सर्व तीर्थांपेक्षा प्रयागतीर्थ वेगळेच आहे. असे हे प्रभू श्रीराम चंद्रांच्या व प्रयागराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महान ठिकाण म्हणजे तीर्थराज घोरवड होय.
हे आहे पाहण्यासारखे
याठिकाणी शेकडो वर्षांपूर्वीचे असंख्य व विशाल वटवृक्ष आहेत. या नैसर्गिक छायेत भगवान जटायुंचे सुंदर छोटेखाणी मंदिर व ज्या ठिकाणी लक्ष्मणाने बाण मारले ते दगडी चिर्यात बनविलेले कुंड आहे. तसेच या वटवृक्षांच्या छायेत. शांत व संथ वाहणारा निर्मळ पाण्याचा झरा आहे. येथील पौराणिक महत्व जाणून महाराष्ट्र शासनाने भक्तांसाठी नुकताच ऐक छान सभामंडप उभारला आहे. असे हे निसर्गरम्य ठिकाण अगदी सिन्नर-घोटी रस्त्याला लागून असून भेट देण्यासाठी सहज जाता येईल असे आहे. घोरवड-पांढुर्ली पंचक्रोशीतील गावकर्यांनी व विश्वस्त मंडळाने येथे खूपच स्वच्छता ठेवली असून यासाठी त्यांना निश्चितच धन्यवाद दिले पाहिजे. तसेच, या परिसरात समर ही वायनरी आहे. तेथे द्राक्ष ते वाईन निर्मितीची प्रक्रीया जाणून घेता येईल. वायनरीचा परिसरही अतिशय सुंदर आहे.
नाशिकपासून अंतर – साधारण २५ किलोमीटर (पाथर्डी मार्गे)
पर्यटनासाठी लागणारा वेळ – २ ते ३ तास
उल्लेखनीय – याठिकाणी दुर्मिळ आणि महाकाय अशी वडाची १००हून अधिक झाडे आहेत. तसेच, येथे पाण्याचे असलेले कुंड आणि परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. येथे आल्यावर आपल्याला जणू जंगलात आल्यासारखे वाटते. त्यामुळे वन डे ट्रीपसाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे.