शिवलिंगाच्या आकाराचा किल्ले धोडप
नाशिक जिल्ह्यातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि साहसी पर्यटनासाठी ख्यात असलेल्या धोडप किल्ला आणि परिसराविषयी जाणून घेणार आहोत. अनेक बाबींनी नटलेला हा परिसर एकदा पहावा असाच आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरास वेगळेच ऐतिहासिक महत्व लाभले आहे. नाशिक जिल्ह्याच्या मध्यातून जाणारी सह्याद्रीची पूर्व-पश्चिम रांग म्हणजे अजिंठा-सातमाळा ही होय. यात चांदवड व कळवण तालुक्यांना विभागणार्या सीमारेषेवरील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप होय. शिवलिंगाच्या आकाराचा माथा असलेला धोडप त्याच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारामुळे दूरवरुनही स्पष्ट दिसतो.
नाशिक येथून आग्रा रोडने मालेगावकडे जातांना वडाळीभोई येथून डावीकडे धोडंबा या गावाकडे जावे लागते. तेथून पुढे हट्टी गावापर्यंत गेल्यास पुढे पायवाटेने किल्याकडे प्रवास सुरु होतो. हट्टी गावाचेही एक वैशिष्ट्य आहे, येथील गावकरी परदेशी आडनावाचे आहेत व ते आपसात हिंदीत बोलतात. कारण, पूर्वी धोडप किल्ल्याच्या संरक्षणासाठी आलेला राजस्थान व मारवाड मधील राजपूत समाज इथलेच रहिवासी झाले. तर काहींच्या मते महाराणा प्रतापांचा हल्दी घाटीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर त्यांचे पूर्वज हट्टी गावात स्थायिक झाले. तसा हा किल्ला भव्य दिव्य असल्याने एका दिवसात चढून व उतरुन येणे कष्टाचे आहे. म्हणून बरेच जण किल्ल्यावर मुक्काम करतात.
येथे किल्ल्यावरील गुहांमधे राहता येते. धोडप किल्यावर काही पडके बुरुज, दरवाजे, गणेशमुर्ती, पाण्याचे टाक, तलाव व शिलालेख बघावयास मिळतात. धोडप किल्ल्याचा उल्लेख साधारण १६ व्या शतकापासून आलेला दिसतो. या किल्ल्याचा परिसर मोठा असल्याने व उंची भरपूर असल्याने किल्ल्यावरुन पश्चिमेला रावळ्या-जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी गड दिसतात. पुर्वेला हंड्या, इखारा हे सुळके तर कांचनगड दिसतो. उत्तरेला कण्हेरगड व सर्वात उंच साल्हेर पहायला मिळतो. यावरुन आपल्याला किल्ल्याचे स्थान महत्व समजून येईल. सर्व दिशांनी सुरक्षित असलेला असा हा किल्ला आहे. धोडपवर चढाई करण्यापूर्वी इतर किल्ले जिंकावे लागतील, अशी रचना आहे. धोडप किल्ला तसा मध्यम श्रेणीत येतो मात्र अगदीच अवघड असा नाही.
कसे जाल
नाशिक-मालेगाव मार्गाने वडाळी येथून रस्तामार्ग सर्वात जवळचा व योग्य मार्ग आहे.
कुठे रहाल
गडाच्या वर गुहेत रहाता येते तसेच तंबू लावता येतात. पायथ्याला हट्टी गावात वनविभागाने धोडप अॅडव्हेंचर थीमपार्क बनवले आहे. येथेही राहण्याची व जेवणाची व्यवस्था होते.
काय बघाल
धोडप परिसरातवर उल्लेख केलेले इतर गड-किल्ले व अॅडव्हेंचर पार्क यातील कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत, रॅपलिंग, बर्मा ब्रिज, झिपलाईन, कमांडो नेट इ., सप्तशृंगी गड व चांदवडचा रंगमहाल, इच्छापूर्ती गणेश मंदिर ही प्रेक्षणीय ठिकाणे बघू शकतात.
काय खरेदी कराल
हट्टी-धोडप परीसरात उच्च दर्जाचा व अवीट गोडीचा खवा घराघरात मिळतो.