राणी की बाव (पाटण)
एखाद्या राजाने आपल्या लाडक्या राणीसाठी महाल बांधला… एखादे राज्य जिंकले… एखादी भेटवस्तू दिली… असे आपण ऐकले आहे. पण, एखाद्या राणीने राजासाठी अत्यंत सुबक व मंदिरासारखी विहीर बांधली हे आपण ऐकले आहे का? पण हो हे खरे आहे. आपल्या INCREDIBLE INDIA तच आहे. आज जाणून घेऊ या अशा अनोख्या पर्यटन स्थळाविषयी….
आपल्या शेजारील राज्य गुजरात मधील पाटण येथे ही पायर्यांची अनोखी विहीर आहे. तिच जगप्रसिद्ध राणी की बाब म्हणून आहे. मी या ठिकाणी जगप्रसिद्ध असे लिहिले आहे कारण, २०१४ मध्ये या विहीरीची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंद करण्यात आली आहे.
या विहीरीचे बांधकाम ११ व्या शतकातील चालुक्यकालीन आहे, असे म्हणतात. राणी उदयमती यांनी त्यांच्या पतीची आठवण म्हणून ही विहीर बांधली. ही विहीर सरस्वती नदीच्या किनारी आहे. मात्र, दरम्यानच्या काळात ही विहीर पुर्णतः जमिनीखाली गेली होती. बडोदा सरकारने १९४० मध्ये उत्खनन केल्यावर या ऐतिहासिक विहीरीस पुनरुज्जीवन मिळाले. आज देशातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून राणी की बाब बघण्यास देश-विदेशातून पर्यटक येतात. महत्वाचे म्हणजे एकेकाळी चिखलात गाळाने भरलेली ही विहीर आज भारतातील सर्वाधिक स्वच्छ पर्यटन स्थळ म्हणून नोंदले गेले आहे.
ही विहीर म्हणजे जणू एक जलमंदिरच आहे. साधारण सात मजले खोल अशी ही पूर्ण पायर्यांची असलेली सर्वात मोठी विहीर आहे. या विहीरीच्या भिंतींवर ५०० मुख्य शिल्पे व हजारो छोटी शिल्पे आहेत. ही विहीर ६५ मीटर लांब व २० मीटर रुंद आणि २८ मीटर खोल आहे. विहीरीस २१२ खांब आहेत. नवीन १०० रुपयांच्या नोटेवर या विहीरीचे चित्र प्रसिद्ध केलेले आहे. तसेच येथून जवळच सहस्रलिंग तलाव आहे. पाटण या गावात तयार होणारी पटोला साडी अतिशय प्रसिद्ध आहे. पर्यटक पाटण सोबत सौराष्ट्रातील भुज, मोढेरा, जुनागढ येथे भेटी देऊ शकतात. अतिशय सुबक, आखीव, रेखीव व आजही सुस्थितीत असलेली ही राणी की बाव पाहण्यासाठी एकदा पाटणला जायलाच हवे.
कसे पोहचाल
पाटण गावापासून १३० किलोमीटर अंतरावर अहमदाबाद विमानतळ आहे. नाशिक ते अहमदाबाद दररोज विमानसेवा आहे. रेल्वेने पाटण रेल्वे स्टेशनला उतरावे. रस्तामार्ग सर्व प्रमुख शहरांशी पाटण जोडलेले आहे. नाशिक येथून रात्रीच्या लक्झरी बसेस आहेत. त्यानेही थेट पाटण येथे जाता येते.
कुठे रहाल
पाटण येथे अनेक छोटी मोठी हाॅटेल्स उपलब्ध आहेत.