माजुली बेट (आसाम)
आज आपण अदभूत अशा माजुली बेटाची माहिती घेणार आहोत. जगातील सर्वात मोठे बेट अशी त्याची ओळख आहे. आयुष्यात एकदा तरी पहावा असा नजारा आणि अनुभुती येथे येते. वेळ न दवडता जाणून घेऊ या अनोख्या ठिकाणाविषयी….
जगातील सगळ्यात मोठी कोणतीही गोष्ट आपल्याकडेच असावी, यासाठी सध्या आखाती देशांमधे स्पर्धा लागलेली आहे. त्यासाठी ते पाण्यासारखा पैसा खर्च करतात. तसेच कुठल्याही थराला जाऊन प्रयत्न करतात. मात्र आपल्या देशात अशा काही सगळ्यात मोठ्या किंवा फक्त आपल्याकडेच असलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यासारख्याच कुणी पैसे खर्चून बनवू शकत नाहीत. किंवा त्यांच्याशी स्पर्धाही करु शकत नाही. मग त्यावर मात करणे तर शक्यच नाही. आज आपण आपल्या हटके डेस्टीनेशन या मालिकेत नदीत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या बेटावर जाणार आहोत. ते बेट म्हणजे आपल्या आसाम राज्यातील ब्रम्हपुत्रा नदीतील माजुली बेट. या बेटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील एकमेव जिल्ह्याचे ठिकाण असलेले बेट आहे. आता मला सांगा असे नदीतील सर्वात मोठे बेट कुणी बनवू शकेल का? तर मुळीच नाही!
माजुली बेटाचे क्षेत्रफळ ३५२ चौरस किलोमीटर एवढे आहे. या बेटावर साधारण २ लाख जण राहतात. हे बेट कुठूनही रस्तेमार्गाने जोडलेले नाही. १६ व्या शतकात झालेल्या भूकंपात ब्रम्हपुत्रा नदीच्या मार्गात बदल होऊन या बेटाची निर्मिती झाली असे म्हणतात. येथे भात हे प्रमुख पीक आहे. मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. पक्षी प्रेमींसाठी माजुली हे बेट फार महत्वाचे आहे. येथे अनेक दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. या परिसरात कसल्याही प्रकारचे औद्योगिक कारखाने नसल्यामुळे हे बेट प्रदूषण मुक्त आहे.
माजुली बेटावर २५० पेक्षा जास्त लहान, मोठी गावे असून सर्व गावे रस्ते मार्गाने जोडलेली आहेत. देशातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच माजुली बेटावर सर्व सुविधा आहेत. या भागात येथे अनेक लहान-मोठ्या माॅनेस्ट्रीज आहेत. युनेस्कोच्या हेरीटेज स्थळांच्या यादीत माजुलीची नोंद होण्यासाठी आसाम सरकारचा प्रयत्न चालू आहे. अशा या आगळ्या-वेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊन वेगळा अनुभव आपण नक्की घ्याल. येथील निसर्ग आणि संस्कृती पाहून तुंम्हाला नक्कीच आनंद होईल, यात तिळमात्र शंका नाही.
कसे पोहचाल
हे बेट राजधानीचे शहर गुवाहाटीपासून साधारण ३०० किलोमीटरवर आहे. तसेच जोरहाट हे जवळचे विमानतळ अनेक मुख्य शहरांशी जोडलेले आहे. जोरहाट येथे रेल्वे स्टेशन आहे. जोरहाट येथून टॅक्सीने निमती घाट पर्यंत जाऊन तेथून फेरी बोटीने माजुली बेटावर पोहचता येईल.
राहण्याची सोय
माजुली बेटावर होम स्टे आणि काही लाॅजेस आहेत. जोरहाट येथे मात्र रिसाॅर्टस व हाॅटेल्स आहेत.
केव्हा जाल
माजुली येथे भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च ही वेळ सगळ्यात चांगली आहे.