भारताचे मिनी स्वित्झर्लंड – चोपटा (उत्तराखंड)
चोपटा हे उत्तराखंड मधील अगदी छोटे गाव आहे. या पूर्ण परिसराचे निसर्ग सौंदर्य पाहून त्यास स्वर्गाची उपमा दिली आहे. चोपटा हे भारताचे मिनी स्विर्त्झलॅंड म्हणूनही ओळखले जाते. आज याच अनोख्या आणि निसर्गरम्य ठिकाणाविषयी आपण जाणून घेणार आहोत….
चोपटा या ठिकाणाहून हिमालयातील अनेक शिखरांचे दर्शन होते. उदा. नंदादेवी, बंदरपूछ, त्रिशूळ,चौखं बा. हे ट्रेकींगसाठी उत्तम ठिकाण असून येथे अॅडव्हेंचर गेम्सची सुविधा आहे. येथे मुक्काम ठेऊन आपण तुंगनाथ, देवरीताल, चंद्रशिला असे काही हटके ट्रेक करु शकतो. हे फारसे अवघड ट्रेक्स नाहीत. तसेच येथून जवळच उखीमठ हे गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केदारनाथाचा सहा महिने मुक्काम असतो. असे सांगतात की, केदारनाथ मंदिर बंद झाल्यावर केदारनाथ येथे राहतात. केदारनाथ पालखीचा सोहळा खास बघण्यासारखा असतो.
या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासुन १३ हजार फूट आहे.
चोपटा गावचा परीसर पाईन, देवदार, र्होडोडेंड्राॅन या वृक्षांच्या जंगलांनी वेढलेला आहे. तसेच या प्रदेशात अनेक दुर्मिळ पशु, पक्षी आढळतात. बर्फवृष्टी (स्नोफाॅल) नंतर तर हा संपूर्ण परिसर डोळे दीपावणाराच असतो. चोपटा हे हिमालयीन प्रदेशात असल्याने एप्रिल ते जुलैपर्यंत येथे स्वच्छ सूर्यप्रकाशाचे वातावरण असते. हा काळ येथे जाण्यासाठी सर्वात योग्य समजला जातो. मात्र सोबत भरपूर थंडीचे कपडे हवेत. या काळात हिमवृष्टी व कॅंम्पिंगचा आनंद घेता येतो. तसेच येथून जवळच औली, लॅंडसडाऊन, व्हॅली ओफ फ्लावर्स अशी अनेक ठिकाणे आहेत. अशा या निसर्गरम्य, सुंदर व फारशी गर्दी नसलेल्या प्रदूषण विरहित निसर्गसंपन्न पर्यटन स्थळाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
कसे पोहचाल
१) विमानाने जाणार्यांसाठी जाॅलीग्रांट (डेहराडून) हे विमानतळ चोपटापासून २२१ किमी अंतरावर आहे. नाशिक-दिल्ली-डेहराडून किंवा मुंबई-डेहराडून विमानसेवा उपलब्ध आहे.
२) रेल्वेने ऋषिकेश पर्यंत व तेथून पुढे टॅक्सीने चोपटा पर्यंत जाता येते. नाशिककरांसाठी हरिद्वार एक्सप्रेसने थेट हरिद्वार पर्यंत रेल्वे सेवा मिळू शकते.
३) रस्ते मार्गाने उत्तराखंडातील सर्व प्रमुख शहरांशी चोपटा जोडलेले आहे.
कुठे रहाल
चोपटा येथे टेंट, कॅम्प, सर्वसाधारण हाॅटेल्स उपलब्ध आहेत. उखीमठ/गुप्तकाशी येथे काही उत्तम हाॅटेल्स आहेत.
तेथील हवामान
मार्च ते मे या काळात ६ ते २९ अंश सेल्सिअस
जून ते सप्टेंबर या काळात १७ ते ३१ अंश सेल्सिअस
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात २ ते २२ अंश सेल्सिअस
येथील परिसराची ही काही छायाचित्रे