बेलूम लेणी (आंध्रप्रदेश)
आज मी तुम्हाला आंध्र प्रदेशातील बेलूम लेणीबद्दल माहिती देणार आहे. बेलूम ही भारतातील दुसर्या क्रमांकाची सगळ्यात मोठी नैसर्गिकरित्या तयार झालेली लेणी/गुहा आहे. या लेणीत विस्तीर्ण रस्ते आहेत तसेच गोड्या पाण्याचे स्रोत आहेत. ही गुहा चित्रावती नदीच्या सततच्या प्रवाहामुळे हजारो वर्षापूर्वी तयार झाली आहे.
गुहेची लांबी साधारण दहा हजार फुट आहे. ही गुहा आंध्र प्रदेशच्या कर्नुल जिल्ह्यातील कोलिमीगुन्डला भागात बेलूम गावाजवळ आहे. सन १८८४ मधे ब्रिटिशांनी या गुहेचा शोध लावला. दरम्यानच्या काळात येथे कुणीही लक्ष दिले नाही. त्यानंतर १०० वर्षांनी आंध्र सरकारने याचे जतन करण्याचे ठरविले. यात प्रामुख्याने पिल्लीद्वारम, कोटिलींगलू, पाताळगंगा असे दालन आहेत. पाताळगंगा येथे पाण्याचा प्रवाह खोल वाहतांना दिसतो व पुढे अदृश्य होतो. तसेच सप्तस्वर गुहेतील स्तंभावर लाकडी दांड्याने वाजवले असता त्यातून वाद्यांसारखा आवाज येतो. म्हणून यास म्युजिकल चेंबर असेही म्हणतात. येथे एक विस्तीर्ण सभामंडप असलेले मेडीटेशन मंदिरही आहे.
काय बघाल
येथून ६० किमीवर गंडीकोटा हे आपल्या सामंद व्हॅलीसारखेच ईरमाल डोंगरात तयार झालेले कॅनियन आहे. तसेच कर्नुल व कडप्पा परिसरात अनेक ऐतिहासिक किल्ले व मंदिरे आहेत.
कसे पोहचाल
तिरुपती हे सगळ्यात जवळचे विमानतळ असून त्याचे अंतर २५० किमी आहे. ताडीपत्री हे जवळचे रेल्वे स्टेशन २६ किमीवर आहे. गुंतकल व कडप्पा हायवेपासून बेलुम गाव अगदी जवळ आहे.
कुठे रहाल
या ठिकाणी राहण्यासाठी फारसे हाॅटेल्स नसले तरी येथून जवळच आंध्र टुरिझम बोर्डाचे हरिता हे छान हाॅटेल आहे. दक्षिण भारतातील हे फारसे परिचीत नसलेले हटके ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल.