फोफसंडी
महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. येथे निसर्गरम्य सागरकिनारे, गड-किल्ले, पुरातन मंदिरे, जंगले-अभयारण्ये आदी तर आहेतच. पण अशी काही आश्चर्यकारक ठिकाणे आहेत की त्यांबाबत महाराष्ट्रातीलजनताही अनभिज्ञ आहे. यातीलच एक सुंदर ठिकाण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील फोफसंडी. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…..
म्हणून सूर्यप्रकाश कमी
फोफसंडी या ठिकाणाचे महत्व म्हणजे येथे महाराष्ट्रातील सर्वात कमी वेळ सूर्यप्रकाश मिळतो. म्हणजेच सर्वात उशिरा सूर्योदय आणि सर्वात आधी सूर्यास्त होणारे गाव म्हणजे फोफसंडी. येथे सूर्योदय हा महाराष्ट्रातील इतर ठिकाणांपेक्षा दोन-अडीच तास उशिरा व सूर्यास्त दोन-अडीच तास लवकर होतो. म्हणजे दिवस हा फक्त सहा ते सात तासांचाच असतो. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दर्यात लपलेले हे फोफसंडी गाव अतिशय निसर्गरम्य आहे.
असे आहे निसर्गसौंदर्य
कुंजीरगडाच्या पायथ्याशी वसलेले हे गाव आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम छोटे खेडेगाव असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीत होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुफान पाऊस पडतो. निसर्गात वसलेले असल्याने निसर्ग सौंदर्याची या गावावर मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. त्यात सह्याद्रीच्या अगदी कुशीत त्यामुळे गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य यांचा सुरेख मिलाप येथे जुळून आलेला आहे.
रंजक इतिहास
फोफसंडी गावाला हे नाव मिळण्याचा इतिहास देखील खुपच रंजक आहे. पॉप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर सुट्टीच्या दिवशी (रविवारी) विश्रांतीसाठी या गावात जात असे. त्यावरूनच या गावाचे नाव फॉपसंडे पडले. पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रूढ झाले. त्या ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या गेस्ट हाऊसचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. मात्र अतिदुर्गम भाग असल्याने अनेक भौतिक सुविधांपासून हे गाव वंचित आहे. पण त्यामुळेच असेल कदाचित पण येथील गावपण टिकून आहे.
येथे कसे जाल
नाशिक पासून फोफसंडी फक्त ११० किमी अंतरावर आहे. अकोलेपासून ४० किमीवर आहे. स्वतःची गाडी घेऊन गेलेले अधिक चांगले. गावाला जोडणारी मर्यादित बस व्यवस्था आहे.
कुठे रहाल
हे गाव अगदी छोटे असल्याने राहण्याची सुविधा नाही. बेसिक सुविधा असलेले होम स्टे आहेत.
काय बघाल
फोफसंडी परिसरात सिझनल धबधबे, निसर्गरम्य पाॅईंटस, जवळच असलेले कळसुबाई शिखर. पावसाळ्यापूर्वी काजवे बघू शकता.
केव्हा जाल
वर्षभर केव्हाही जाता येते, पण पावसाळा अगदी योग्य
परिसराची काही छायाचित्रे