तुर्तुक
आपल्या देशातील हटके डेस्टीनेशन मालिकेत आपण वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती घेत आहोत. अशाच एका आगळ्या-वेगळ्या गावा विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. या गावाचे नाव आहे “तुर्तुक”.
लेह पासून २०५ किलोमीटरवर भारताच्या उत्तरेकडील सीमेजवळील शेवटच्या गावांपैकी एक म्हणजे “तुर्तुक”. हे गाव १९७१ च्या भारत-पाक युद्धापूर्वी पाकिस्तानमध्ये होते. या युद्धामध्ये जी ६ गावे जिंकून भारताने ताबा मिळवला त्यातीलच तुर्तुक हे एक गाव. हे गाव पाकव्याप्त काश्मीर मधील बाल्टीस्तानमधे आहे. या गावातील नागरिकांची मुख्य भाषा बाल्टी आहे. तर काही जण लडाखी व उर्दू बोलतात. तुर्तुक हे सियाचीन ग्लेशिअरच्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे. तुर्तुकचे जर्दाळू जगभर प्रसिद्ध आहेत. सिझनमधे येथे ऐप्रिकाॅट ब्लाॅसम टूर हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण बनले आहे.
या गावातील नागरिकांची जीवनशैली थोडी वेगळी आहे. येथील मुख्य समाज हा इस्लामिक असून ते शुद्ध शाकाहारी आहेत. मात्र ते इराणी कॅलेंडर वापरतात. येथे दरवर्षी २१ मार्चला नवरोज फेस्टिव्हल आयोजित केला जातो. या भागातील नागरिक गोल्फ व पोलो हे खेळ खेळतात. गावात बाल्टीस्तानच्या राजाचा राजवाडा आहे. जगातील सर्वाधिक सुंदर स्रिया या बाल्टीस्तान मध्ये आहे, असे मानले जाते. या भागात रासायनिक खतांच्या वापरावर पुर्णपणे बंदी आहे. तसेच या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक घरात एकतरी गाढव पाळतातच. कारण हिवाळा सुरु होण्यापूर्वी सियाचीन येथे भारतीय सैन्याला पूर्ण ऋतूत पुरेल इतके सामान गाढवांवर वाहून न्यावे लागते. याकामात स्थानिक नागरिक वर्षभराची बेगमी करुन घेतात. तसेच कुठल्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची येथे परवानगी नाही. असे हे आगळे वेगळे, सर्वार्थाने महत्वाचे असलेले हटके गाव, जे सर्व भारतीयांच्या अभिमानाचे प्रतिक आहे. हिमालय पर्वतरांग, दऱ्या, खोऱ्या, खळाळती नदी, हिमाच्छादित पर्वत आणि नयनरम्य निसर्ग ठेवा अशा सान्निध्यात राहण्याचा आनंद काही विरळाच आहे.
कसे पोहचाल
तुर्तुक येथे विमानाने जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ लेह आहे. तेथून २०५ किमीवर गाव आहे. रस्तेमार्गे मनाली किंवा श्रीनगर मार्गे लेह येथे जाऊन पुढे टॅक्सीने जाता येते.
कुठे रहाल
तुर्तुक येथे पक्के व्यावसायिक बांधकामास परवानगी नसल्याने हाॅटेल्स नाहीत. परंतु अतिशय सुंदर असे इको फ्रेंडली होम स्टे आहेत. तसेच काही कॅम्पस पण आहेत.
केव्हा जावे
मे ते सप्टेंबर या काळात येथे ८ ते २० डिग्री सेल्सिअस तपमान असते. हा कालावधी पर्यटनासाठी योग्य असतो.