टिपेश्वर अभयारण्य- जंगल सफारी
वाघांच्या सफारीसाठी ख्यात असलेल्या टिपेश्वर अभयारण्याच्या भटकंती विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेले स्थळ खरोखरच एकदा बघावे असेच आहे.
भारतात जेव्हा व्याघ्र संरक्षण प्राधिकरण स्थापन झाले तेव्हा सुरुवातीला फक्त ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता ही संख्या ० पेक्षा अधिक झाली आहे. भारतातील १७ राज्यांमध्ये वाघांचा अधिवास आहे. २००६ साली भारतात १४११ वाघ होते तर ती संख्या २०१९ च्या गणनेनुसार जवळपास २९६७ इतकी झालेली आहे.
सध्या महाराष्ट्रातील ताडोबा, मध्य प्रदेशातील कान्हा, पेंच, पन्ना व उत्तराखंडमधील जिम काॅर्बेट अशा काही ठराविक जंगलांचे आकर्षण आहे. परंतु या ५० पैकी काही अभयारण्य अतिशय लहान असून लोकांपर्यंत याची माहिती पोहचलेली नाही. ती जाणून घेतली तर आपल्याला व्याघ्र दर्शन नक्कीच घडू शकते.
टिपेश्वर हे छोटे अभयारण्य महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात वसलेले आहे. याचे क्षेत्रफळ केवळ १४८ चौरस किमी आहे. हे अभयारण्य महाराष्ट्र व तेलंगण सीमेजवळ असलेल्या पांढरकवडा शहराजवळ आहे. या अभयारण्याजवळ पुर्णा, ताप्ती या नद्या आहेत. हा भाग डोंगराळ व ऊंच सखल आहे. त्यामुळे बदलत्या भूभागावर येथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आढळतात. हे घनदाट जंगल असल्यामुळे येथील वातावरण वर्षभर आल्हाददायक असते.
२०१८ च्या व्याघ्र गणनेनुसार या छोट्याशा अभयारण्यात किमान १२-१४ वाघ आहेत. तसेच ताडोबा, पेंच ही अभयारण्ये देखील येथून जवळच आहेत. तेथील वाघही कधी कधी टिपेश्वरमध्ये येतात. त्यामुळे येथे वाघ दिसण्याची शक्यता जास्त असते. येथे वाघांसोबत अस्वल, सांबर, नीलगाय, चितळ, काळावीट आदी प्राण्यांचे दर्शन घडते. तसेच येथे १५८ जातींचे अनेकविध स्थानिक व स्थलांतरीत पक्षी आढळतात. येथे मोरांची संख्या ही लक्षणीय आहे. अशा या आपल्या अगदी जवळ असलेल्या व फारश्या प्रसिद्ध नसलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघोबा बघण्यास विसरु नका.
कसे पोहचाल
१७२ किलोमीटर अंतरावर नागपूर विमानतळ व रेल्वे स्टेशन आहे. तसेच ३५ किमीवर आदिलाबाद (तेलंगणा) हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. येथून फक्त ७२ किमीवर यवतमाळ हे शहर असून आपण नाशिक-पांढरकवडा-यवतमाळ-टिपेश्वर असे रस्ते मार्गे पोहचू शकतो.
कुठे रहाल
टिपेश्वर येथे काही छान जंगल रिसाॅर्टस आहेत. जलपंदा खात्याचे गेस्ट हाऊसही उपलब्ध असते.
भेट देण्याची योग्य वेळ
येथे भेट देण्यासाठी योग्य वेळ साधारण नोव्हेंबर ते मार्च आहे. परंतु एप्रिल व मे महिन्यात वन्यजीव पाणी शोधण्यासाठी बाहेर जास्त पडतात. त्यावेळी पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी येतात. या काळात व्याघ्र दर्शनाचा उद्देश सफल होतो.