अहिल्यादेवींचा रंगमहाल उर्फ होळकर वाडा
आपल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ऐतिहासिक महत्व असलेले गाव म्हणजे नाशिक-आग्रा हायवेवरील चांदवड गाव. तालुक्याचे गाव असलेले चांदवड हे नाशिक-मालेगाव रोडवरील एक महत्वाचे व मध्यवर्ती ठिकाण उजेडात आले ते राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली कामगिरीमुळे. येथे असलेला रंगमहाल, रेणुकादेवीचे मंदिर आणि परिसर खरोखरच भेट देण्यासारखा आहे. आज जाणून घेऊ या परिसराविषयी..
सन १७५० च्या सुमारास मल्हारराव होळकर यांच्या युद्ध नैपुण्याने प्रभावित होऊन दिल्लीच्या बादशहाने त्यांना चांदवड प्रांताची सुभेदारी दिली. सन १७५० ते १७६५ या काळात राणी अहिल्यादेवींनी संपूर्ण चांदवड शहराची तटबंदी केली व शहरात प्रवेश करण्यासाठी सात वेशी (भव्य प्रवेशद्वार) बांधल्या. याचे अवशेष आपणांस आजही बघावयास मिळतात. त्याच्या आत भव्य असा किल्या सारखा राजवाडा बांधला. तोच रंगमहाल किंवा होळकर वाडा. अहिल्यादेवींच्या वारसांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवल्याने आजही रंगमहाल अगदी सुस्थितीत आहे. पूर्वीच्या चांदवड गावाचा बराचसा भाग रंगमहालाने व्यापलेला आहे.
म्हणून रंगमहाल हे नाव पडले
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत हा राजवाडा वसलेला असल्याने त्याचे महत्व वेगळे आहे. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे राजस्थानातील राजे महाराजांच्या अलिशान राजवाड्यांसारखाच हा महाल भव्य दिव्य आहे. याचे अप्रतिम लाकडी कोरीवकाम, संपुर्ण चांदवड शहराची तहान भागवणारी भव्य बारव, यातील रंगीत चित्रे, दरबार हाॅल यामुळे हा रंगमहाल ओळखला जातो. या रंगमहालाचे पूर्वी होळकर वाडा असे नाव होते. परंतु याठिकाणी चितारण्यात आलेल्या चित्रांमुळे यास रंगमहाल असे नाव पडले. या चित्रांमधे प्रामुख्याने निसर्गचित्रे, पशू-पक्षी, तत्कालीन सन-वार, प्रथा, महिला-पुरुष, त्यांची वेशभूषा यांचा समावेश असून केवळ निसर्गातील वनस्पतींपासून बनवलेले रंग वापरल्याने यातील काही चित्रे आजही व्यवस्थित आहेत.
महालाचे जतन
रंगमहाल सुस्थितीत असण्याचे प्रमुख कारण येथे अनेक वर्षे जवळपास सर्वच शासकीय कार्यालये, शाळा, आयटीआय, न्यायालय यांची कार्यालये होती. त्यातील काही आता दुसरीकडे गेली असली तरी पुरातत्व विभागाने संपुर्ण रंगमहालाचे ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असल्याने रंगमहालाचे आयुष्य वाढले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. रंगमहालाचा दरवाजा मोठा, आकर्षक व भक्कम असून महालात अनेक दालने आहेत. याठिकाणी आजही राणी अहिल्यादेवींचे सुमारे २५० वर्षे पूर्वीचे तैलचित्र जतन करुन ठेवली आहेत.
अहिल्यादेवींचे द्रष्टेपण
एकाचवेळी महादेवाची पिंड व तलवार सोबत ठेवणार्या अहिल्यादेवींची कामकाजाची पद्धत यावरुन समजू शकते. राणी अहिल्यादेवींचे त्यावेळचे सामाजिक कार्य हे त्यांच्या दूरदर्शीपणाचे उदाहरण आहे. कारण आज २५० वर्ष झाली तरी संपूर्ण देशभरात आजही लोक त्यांनी बांधलेल्या विहीरी व बारवेतील पाणी पितात. रंगमहाल व चांदवड परिसरात आजही अनेक भुयारे अस्तित्वात आहेत. चांदवड गावात आजही अनेक मोठ-मोठे वाडे आहेत. देशातील विविध भागामध्ये कालौघात अनेक राजवाडे धारातीर्थी पडले पण अहिल्यादेवींचा रंगमहाल ताठ मानेने अजूनही उभा आहे. हा राजवाडा इंदूर येथील होळकर घराण्याच्या ताब्यात आहे. अशा या गौरवशाली इतिहास असलेल्या रंगमहालास एकदा भेट द्यायलाच हवी.
कसे जाल
नाशिकपासून ६५ किलोमीटर असलेले चांदवड हे राष्ट्रीय महामार्ग (मुंबई-आग्रा) वर आहे. चांदवडला रेल्वेमार्ग नाही पण जवळचे स्टेशन मनमाड आहे.
कुठे रहाल
चांदवड गावात व हायवेवर काही निवडक लाॅजेस आहेत. तसेच नाशिक शहरात राहूनही दिवसभरात चांदवडला जाणे आणि येणे शक्य आहे. म्हणजेच वन डे टूरसाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
काय बघाल
रेणुका देवीचे मंदिर, इच्छापूर्ती गणेश मंदिर, चंद्रेश्वर मंदिर व टांकसाळ, राजदेर व धोडप किल्ला इ.
काय खरेदी कराल
चांदवड परिसरात घराघरामध्ये दुधाचा खवा बनविला जातो. त्यापासून बनवलेले पेढे व इतर मिठाई अवश्य खरेदी करावी.