नाशिक – करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भगूर गावात दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील भगूर गावात प्रवेश करणाऱ्या पांढुर्ली रोडवर दररोजच भाजी विक्रेते ठाण मांडून बसत होते.कालपासून येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा आरोग्य विभाग व पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करत येथील भाजीपाला विक्रेत्यांना येथे बसण्यास बंदी करण्यात आली आहे.
या भागात असलेल्या एका व्यावसायिक संकुलासमोर दररोज भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणावर आपला भाजीपाला घेऊन विक्री करण्यासाठी येत असतात. त्यासोबत काही शेतकरी येतात मात्र भगूर गावात व विजय नगरात प्रवेश करणारा प्रमुख रस्ता आहे याशिवाय या भागात राहणारे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व जवान तसेच स्थानिक नागरिक देवळालीत न जाता येथे विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत असल्याने सांयकाळपासून मोठी गर्दी होत होती. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांसह येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे ही गर्दी कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासन व पोलिसांनी एकत्रितरित्या ही कारवाई केली आहे.