काठमांडू – नेपाळमधील सुप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर बुधवारपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टने ही माहिती दिली. कोरोनाच्या संकटामुळे हे मंदीर बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, मंदिर बंद असले तरी दैनंदिन पूजा, आरती, प्रसाद, प्रार्थना आदी नियमितरित्या होत होते.
मंदिर जरी खुले करण्यात आले असले तरी कोरोनापासून बचावासाठी जे नियम आहेत त्यांचे पालन करूनच भक्तांना दर्शनाची परवानगी दिली जाईल, असे मंदिर ट्रस्टचे सचिव प्रदीप ढकाल यांनी सांगितले. भाविकांनी मास्क लावणे अनिवार्य आहे. शिवाय त्यांना सॅनिटाईझ करण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तर रांगेत परस्परांपासून जवळपास २ मीटरचे अंतर ठेवण्यात येणार आहे. सध्या कोणताही अभिषेक, होम, भजन वगैरे येथे करण्यात येणार नाही. पण हळूहळू या गोष्टी देखील सुरु करण्यात येतील असे ढकाल म्हणाले. मंदिर बंद असल्याने या काळात ट्रस्टला तब्बल ७० कोटी नेपाळी रुपये इतके नुकसान झाले आहे.