जगन्नाथपुरी – श्री वसंत पंचमीच्या निमित्ताने भगवान जगन्नाथच्या एका भक्ताने भगवान बालभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ या मंदिरात चार किलोपेक्षा जास्त सोन्याचे आणि तीन किलो चांदीचे दागिने दान केले. याची बाजारातील किंमत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. की, या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे एकूण वजन आठ किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे आणि ते दागिने विशेष कार्यक्रम प्रसंगी वापरले जातील. सोन्याच्या दागिन्यांचे वजन ४.८५ किलो आहे आणि त्याची किंमत २ कोटी ३० लाख रुपये आहे, तर चांदीच्या दागिन्यांचे वजन ३.८७ किलो आहे आणि त्याची किंमत २ कोटी ९१ लाख रुपये आहे.
मुख्य प्रशासक कृष्णा कुमार यांना मंदिर प्रांगणातील व्यवस्थापकीय समितीचे काही सदस्य आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भक्ताच्या प्रतिनिधींनी दागिने भेट दिली आणि दागिने सुपूर्द केले. कुमार म्हणाले की, दान करणाऱ्या दात्याला प्रसिद्धी नको म्हणून नाव न घेण्याची विनंती केली होती. त्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये झोबा, श्रीमुख आणि पद्म या तीन मूर्ती आहेत. कडक सुरक्षा दरम्यान हे दागिने मंदिर कार्यालयाच्या तिजोरीत ठेवण्यात आले आहेत.