भंडारा – येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बाळांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत भानारकर कुटुंबियांवरही मोठा आघात झाला आहे. भानारकर कुटुंबियांना यापूर्वी चार बाळ जन्मली. पण, ती मृतावस्थेतच त्यांच्या हाती पडली. आता पाचव्यांदा बाळ झालं आणि ते जगलं. पण, नियतीने हे बाळही हिरावून घेतलं. त्यांची ही व्यथा हृदय पिळवटून टाकणारीच आहे.
राज्यभरात भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्देवी घटनेची चर्चा होत आहे. याच दुर्घटनेत भानारकर कुटुंबाची व्यथा अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी आणि सुन्न करणारी आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या हिरालाल आणि हरकन्या भानारकर यांची करुण कहाणी समोर आली आहे. हिरकन्या यांची पाचव्यांदा प्रसुती झाली. यापूर्वी चारवेळा झालेल्या प्रसुतीत त्यांना मृत बाळे जन्माला आली. त्यामुळे त्यांना जिवंत आणि गोंडस बाळाचे वेध लागले होते. अखेर गेल्या ६ जानेवारी रोजी साकोला येथील उपजिल्हा रुग्णालयात हिरकन्या यांची प्रसुती झाली. त्यांच्या पदरी लक्ष्मी जन्माला आली. गोंडस असलेली ही कन्या मात्र, केवळ एक किलो वजनाची होती. त्यामुळेच या कन्येला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. दोन दिवस या बाळावर उपचार झाले. आणि ८ जानेवारी रात्री नियतीने वेगळाच खेळ खेळला. रुग्णालयाच्या विशेष दक्षता विभागाला लागलेल्या आगीत भानारकर कुटुंबाची लक्ष्मी होरपळून मृत्यूमुखी पडली. ही बाब कळताच भानारकर कुटुंबियांवर दुःखाचा मोठा पर्वतच कोसळला आहे. देवानं लक्ष्मी दिली पण नियतीने ती सुद्धा हिरावल्याने त्यांचं जणू आभाळच फाटलं आहे. सरकारने पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली, मुख्यमंत्रीही सांत्वनाला आले पण आता आम्ही लक्ष्मीला कुठे आणि कसे शोधायचं, असा यक्ष प्रश्न भानारकर कुटुंबियांना पडला आहे.