नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने २०२०-२१ मध्ये केलेली भंगार विक्री आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. या विक्रीतून भारतीय रेल्वेला २०-२१ या आर्थिक वर्षात तब्बल ४ हजार ५७३ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. आणि ही कमाई २०१९-२० मधील म्हणजेच गेल्यावर्षीच्या ४ हजार ३३३ कोटी रुपयांच्या तुलनेत ५.५ टक्क्यांनी जास्त आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे २००९-१० मध्ये रेल्वेला ४ हजार ४०९ कोटी रुपयांची कमाई झाली होती. यंदाची कमाई ही सर्वाधिक आहे. सर्व उपलब्ध संसाधने वापरून भंगार माल जागेवरून उचलून ई-लिलावाच्या माध्यमातून त्याची विक्री करणे यावर रेल्वेने मेहनत घेतली.
सेवा न देणारा/ जुना झालेला माल वेगळा करून त्याची विक्री करणे ही रेल्वे विभागात सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे आणि विभागीय रेल्वे तसेच रेल्वे मंडळाकडून तिची उच्चस्तरीय देखरेख होते. भंगार माल त्या त्या ठिकाणहून आणून त्याची ई-लिलावाद्वारे विक्री करणे यावर रेल्वे व्यवस्थापन सर्व मेहनत घेते. सर्वसाधारणतः उभारणीच्या प्रकल्पातील गेज बदलण्याच्या कामात जास्तीत जास्त भंगार निर्माण होतो. यातील काही कायमस्वरूपी घटक हे रुळांवर पुन्हा वापरण्याजोगे नसतात. रेल्वेच्या लिखीत तरतुदींनुसार असा माल निकालात काढला जातो.